Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अंगाराने कार्य केले आता ज्योत हवी



 तेरा चौदा वर्षांपूर्वी आंबेठाणच्या या अंगारमळ्यामध्ये मी शेतीचा हा प्रयोग चालू केला. या प्रयोगातून अशी काही संघटना तयार होईल, असं काही आंदोलन उभं राहिल अशी अपेक्षाही नव्हती. जगातील सगळ्या देशांमध्ये जे जे शेतीवर जगत राहतात ते ते गरीब होत जातात आणि शेती सोडून जे जे बाहेर निघतात त्यांची परिस्थिती सुधारत जाते हे काय गौडबंगाल आहे, हे काय गूढ आहे हे समजण्याकरिता आंबेठाणचा प्रयोग चालू झाला. त्यानंतरचा तेरा चौदा वर्षांचा इतिहास सगळ्यांना माहीतच आहे.
 पण मागं वळून पाहता मला असं वाटतं, की गेल्या तेरा चौदा वर्षांमध्ये मी फार भाग्यशाली राहिलो आहे. व्यक्तिगत पातळीवर खासगी आयुष्यात तसेच संघटनेच्या आंदोलनामध्ये अनेक दुःखदायक गोष्टी घडल्या आहेत, कित्येक सहकारी रागावले, कित्येक नाराज झाले आणि त्याच्या उलट गोळीबारामध्ये ज्यांच्या घरची कर्ती माणसंसुद्धा निघून गेली. त्या घरच्या माणसांनीसुद्धा एका शब्दानं कुठं राग, दुःख व्यक्त न करता प्रेम आणि सहानुभूती व्यक्त केली. असे चित्रविचित्र अनुभव गेल्या या तेरा चौदा वर्षांत मला आलेले आहेत; पण माझा जो काही 'खर्च झाला तो केव्हाच, पहिल्या दोन वर्षांतच भरून निघाला.
 आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी मला कुणीतरी विचारलं होतं की आता या पुढचा तुमचा कार्यक्रम काय? त्यावेळी मी म्हटलं होतं की, "हे आंदोलन किंवा ही संघटना चालू होताना मला असं करण्याकरता दहाएक वर्ष लागतील; पण दोनएक वर्षांमध्येच महाराष्ट्रामध्ये संघटना तयार झाली. गावोगाव संघटना गेली नसेल, सगळ्या तालुक्यांत गेली नसेल; पण संघटनेचा विचार महाराष्ट्रभर गेला; मला या प्रयोगातून आयुष्यात जे काही मिळवायचं होते ते मिळून गेलं. आता याच्यापुढे जे काही मिळवायचं आहे ते केवळ 'बोनस' म्हणून मिळणार आहे. माझा जो काही 'खर्च झाला होता तो केव्हाच, दोन वर्षातच 'भरून'

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३८