Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केलं तर आम्हाला बँकांकडून कर्ज घ्यावी लागतील.' अन्नखात्याचे ते अधिकारी म्हणाले, 'सरकारपुढे फक्त दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही आम्हाला उसनी साखर द्यायची. न द्याल तर सरकार लेव्ही साखर ६५ टक्क्यांच्या जागी ७५ टक्के वसूल करणार.' म्हणजे तुम्ही स्वखुशीने द्या, नाही तर आम्ही सक्तीने घेऊ. हा चक्क दरोडेखोरी बाणा झाला.
 केंद्र सरकार आपल्याकडून ६५ टक्के साखर २ रुपये ७२ पैसे किलोने घेऊन जाते. आयात साखरेमुळे बाजारातील भाव ६ रुपयांवरून साडेचार रुपयांवर घसरला. त्या साडेचार रुपयांतले फक्त २ रुपये ७२ पैसे शेतकऱ्याला मिळाले. मग आमचे वसंतदादा पाटील साखरसंघातर्फे दिल्लीला भेटायला गेले. वसंतदादा पाटलांना आपण तळ्यात आहोत का मळ्यात हेच समजेनासे झाले आहे. शेतकऱ्यांनी इथे जेव्हा उसाच्या भावाचे आंदोलन चालू केले तेव्हा ते म्हणाले की, 'शेतकऱ्यांचा माझ्या या मागणीला पाठिंबा आहे; पण आंदोलनाचा मार्ग ज्या त-हेने चालला आहे ते मला मान्य नाही.' मग तुमच्या तऱ्हेने आंदोलन करा ना? तिकडे कसली आंदोलने करता दिल्लीत बसून! शेतकऱ्याला ३०० रुपये भाव मिळाला पाहिजे आणि तो मिळाला नाही तर शेतकरी मरणार आहे हे जर तुम्हाला पटत असेल तर दिल्लीमध्ये राहण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही; काय करायचे असेल ते इथे येऊन करा; पण ज्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांकरिता वसंतदादांनी आपले एवढे आयुष्य वेचले त्यांच्याकरिता काहीही न करता वसंतदादांनी त्यांचा गळा कापला आहे. एक महिन्यापूर्वी दिल्लीला वसंतदादा म्हणाले की, 'फ्री सेल साखरेचा भाव ६ रुपयांच्या खाली येता कामा नये.' म्हणजे वसंतदादांनी दिल्लीत बसून नुसते बोलायचे आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी लाठ्या खायच्या आणि वर दिल्लीत बसून त्यांनी असेही म्हणायचे की हे आंदोलन मला पसंत नाही. असले ढोंगी पुढारी आम्हाला नकोत. ६ रुपये भाव मिळावा असे वाटत असेल तर ६ रुपये भावाकरिता प्रसंगी लाठ्या झेलायला तयार असतील तेच आमचे पुढारी, बाकीचे लोक आमचे पुढारी नाहीत.
 तेव्हा, आपल्याला आपला लढा आपल्याच ताकदीवर चालू ठेवायला पाहिजे.

 कोणतेही लष्कर काय करते? युद्धाची तयारी करतात म्हणजे काय करतात? तर मागल्या वेळी युद्धात शत्रुपक्षाने काय डावपेच टाकले होते ते बघतात आणि त्याप्रमाणे पुढच्या युद्धासाठी तयारी करतात. त्याचप्रमाणे, १९८० साली शेतकऱ्यांनी आंदोलन करून आपल्याला नमवले; तेव्हा त्यांनी काय रणनीती वापरली तिला तोंड देण्यासाठी तयारी करू या असे ठरवून सरकारने तयारी चालवली आहे. साखरेचा तुटवडा झाला तर हे लोक आंदोलन करून कारखाने बंद पाडू शकतात

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १९