माझ्या शेतकरी भावांनो, मायबहिणींनो आणि पोलिस भावांनो,
शेतकरी भावांना, मायबहिणींना हाक घातल्यानंतर पोलिसांनाही मी आवाहन करतो आहे, अशाकरिता की, आजचा हा कार्यक्रम काही सभेचा नाही, आजचा हा कार्यक्रम आंदोलनाचा आहे. मी, शरद जाशी, राहणार आंबेठाण, ता.खेड, जि. पुणे. कायद्याच्या दृष्टीने गुन्हा करून इथे उभा आहे. इथे येण्यापूर्वी या गावातल्या भाताच्या 'हलर'चं उद्घाटन मी माझ्या हातानं केलेलं आहे. माझ्याबरोबर मंचावर बसलेले, शेतकरी संघटनेचे दोन माजी अध्यक्ष, एक सध्याचे अध्यक्ष, तीन आमदार, शेतकरी महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याच्या प्रमुख, लातूर जिल्ह्याच्या प्रमुख असे कित्येक कार्यकर्तेही माझ्याबरोबर होते. माझ्यासमोर बसलेल सर्व हजारो मायबहिणी हेदेखील या बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील झालेले आहेत आणि आम्ही, तुमच्या दृष्टीने जो गुन्हा आहे असे कृत्य केल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. त्याची जी काही शिक्षा द्यायची ती शिक्षा घ्यायला आही तयार आहोत. तुम्ही अटक करणार असलात तर त्याकरिता आम्ही तयार आहोत.
परवाच्या दिवशी मी दिल्लीला होतो. अंदाजपत्रकाची चर्चा झाली आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग मला म्हणाले की, "अंदाजपत्रकासंबंधी थोडी अधिक चर्चा करायची आहे, तुम्ही थांबू शकता का?" मी म्हटलं, "आज थांबायला काही वेळ नाही, कारण मला नागपूरला लगेच जायचं आहे." "काय काम आहे?" म्हणाले तेव्हा मी त्यांना म्हटलं की, "नागपूरला जाऊन एक बिगरपरवाना भाताचा हलर चालू करायचा आहे." ते म्हणाले, "त्यात अडचण काय आहे?" मी म्हटलं, "हिंदुस्थान देशामध्ये, तुमच्या राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे की मोटारींचा कारखाना काढायचा म्हटला तर लायसेन्सची गरज नाही, विमानाचा कारखाना काढायचा म्हटला तरी लायसेन्सची गरज नाही; पण भाताची गिरणी टाकायची झाली तर त्याला लायसेन्स लागतं, कापसाचा रेचा टाकायचा झाला तर