Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंडित नेहरूंचं म्हणणं उलटं होतं. त्यांचं म्हणणं होतं, की गावं नाही, शहरं मोठी करा; कारखाने बांधा. शहरं मोठी झाली, कारखाने आले म्हणजे देशाचा विकास होतो.
 दोघांनी एकमेकांशी चर्चा केली. दोघांनी एकमेकांना पत्रं लिहिली आणि महात्मा गांधींनी एका पत्रामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना म्हटलं, "कारखानदारी म्हणजे देशाचा विकास असं जर तुझं मत ठाम असेल तर तुझ्या मताविरुद्ध लढा करायला स्वतंत्र हिंदुस्थानातसुद्धा मी पुन्हा उभा राहीन."
 हा लढा झाला नाही. पंडित नेहरू पंतप्रधान झाले आणि त्यानंतर नवीन नेहरूसरकार ज्या तऱ्हेची धोरणं आखायला लागले ते पाहून गांधीजींच्या सगळ्या जवळच्या माणसांना चिंता वाटायला लागली. ज्या स्वातंत्र्याची आपण इतके दिवस वाट पाहिली ते स्वातंत्र्य आलं, लाल किल्ल्यावर झेंडा फडकला पण ही जी काही नवीन धोरणं आहेत ती काही गांधीजीची धोरणं नाहीत; वेगळीच, विचित्र धोरणं आहेत.
 या सेवाग्रामला बैठक ठरलेली होती. मला आठवते त्याप्रमाणे ४ फेब्रुवारी १९४८ रोजी ही बैठक व्हायची होती. दिल्लीला आणखी एक दोन दिवस राहून गांधीजी इकडे सेवाग्रामला यायला निघणार होते आणि नेहरूपद्धतीचा तोंडवळा असलेली देशाची अर्थव्यवस्था न ठेवता गावावर आधारलेली, गांधींच्या पद्धतीची अर्थव्यवस्था कशी व्हावी याची चर्चा इथं व्हायची होती. हे सगळं फसलं. किती दिवसांनी फसलं? फक्त चारपाच दिवसांनी. ४ फेब्रुवारीला महात्माजी इथं यायचे होते आणि ३० जानेवारीला त्यांची हत्या झाली. एक कालखंड संपला.
 नेहरू-अमलाचा अंत
 ६ डिसेंबरला जेव्हा बाबरी मशीद पाडली तेव्हा संध्याकाळी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव रेडिओवर बोलले. ते काय म्हणाले? ते म्हणाले, "आज बाबरी मशीद पाडली. ही महात्मा गांधीच्या हत्येनंतर घडलेली सर्वांत मोठी दारूण घटना आहे." पी. व्ही. नरसिंहराव त्यावेळी फार मोठं बोलून गेले. त्यांना कल्पना नसेल इतकं मोठं सत्य बोलून गेले.
 ज्या दिवशी बापूजींना गोळी लागली आणि ते गेले त्या दिवशी गांधीयुगाचा अंत झाला. गांधीयुग संपलं आणि त्या दिवशी चालू झाला पंडित नेहरूंचा अंमल; युग नव्हे, अंमल. गेली ४५ वर्षे तो चालू आहे; पण जेव्हा बाबरी मशीद पडली त्या दिवशी नेहरू - अमलाचा अंत झाला. नेहरूंनी जी काही व्यवस्था तयार केली ती संपलेली आहे आणि हिंदुस्थानामध्ये १९५० मध्ये जी घटना लिहिली गेली ती घटना, त्या सालापासून जे गणराज्य तयार झालं ते गणराज्यसुद्धा

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७४