राव आणि दुसऱ्याचं डॉ. मनमोहन सिंग. यांनी जागतिक बँकेमध्ये जाऊन सांगितलं आहे की, "आता ही जुनी नेहरूनीती संपली, आता पुन्हा आम्ही चूक करणार नाही." आता आम्ही बळिराज्याकडे जाणार आहोत. या दोन डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा मी म्हटलं, "हा मुडदा आता जाळून टाका."
घराण्याचीच पूजा
तिकडे मार्क्स एंगल्स्चे पुतळे खाली ओढले. आमच्याकडे काय दिसतं? मुंबईच्या त्या बंदराला नेहरूंचं नाव दिलं आहे. नेहरूंचा बंदराशी काय संबंध आहे? सबंध देशामध्ये परिस्थिती अशीच. बंदरावर उतरलं तर बंदराचं नाव जवाहरलाल नेहरू, विमानतळावर उतरलं तर विमानतळाचं नाव इंदिरा गांधी, तिथून कोणत्या रस्त्यानं निघालो तर त्याचं नाव राजीव गांधी पथ, तिथून खेळ बघायला जावं तर त्या खेळाच्या स्टेडियमचं नाव संजय गांधी आणि तिथं ज्या काही खेळाचा सामना चालला असेल, मग तो फुटबॉलचा असो क्रिकेटचा असो, त्याच्या चषकाचं नावसुद्धा पुन्हा इंदिरा गांधी सुवर्णचषक! या देशात दुसरी नावं काही नाहीत? या देशामध्ये चांगलं काम करणारे दुसरे कुणी झालेच नाहीत?
सरखेल कान्होजी आंग्रे बंदर
मुंबईच्या या न्हावा-शेवा बंदराजवळ पंडित नेहरूंनी काय मोठी कामगिरी गाजवली? त्या जागी कामगिरी केली कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी तिथे ऐतिहासिक कामगिरी बजावली. त्या बंदराला कुणाचं नाव शोभेल तर ते सरखेल कान्होजी आंग्रे यांचं. आपण मुंबईत जाणार होतो ते या बंदराचं नेहरू नाव बदलून ते 'सरखेल कान्होजी आंग्रे' द्यायला जाणार होतो. आपण मुंबईला गेलो असतो तर नाव बदलण्याचा हा कार्यक्रम प्रत्यक्षात पार पडला असता; पण आज आपल्याला इथं सेवाग्रामला हा मेळावा भरवायला लागला आहे. आज आपण मुंबईला जरी नसलो तरी आज मी जाहीर करतो की न्हावा-शेवाच्या या बंदराचं नाव यापुढे 'सरखेल कान्होजी आंग्रे बंदर' करण्यात आले आहे. यापुढे 'नेहरू बंदर' हे नाव कुणीही वापरू नये. इतकंच नव्हे तर त्या भागातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मी आदेश देतो की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या बंदराजवळील 'जवाहरलाल नेहरू' हे नाव खोडून त्याऐवजी 'सरखेल कान्होजी आंग्रे बंदर' असे नाव लिहा. पोलिस जो काही खटला भरतील त्याची जबाबदारी मी घेतो.
बस. मुंबईला गेलो असतो तर एवढंच काम झालं असतं. आपण गव्हाच्या आयातीचा निषेध केला असता, दोन तीन दिवस गहू थांबवला असता. त्या
पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/७२
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ७२