Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


नव्या लढाईची घोषणा



 माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो,
 शेगाव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एवढ्या प्रचंड संख्येने एकत्र जमून आपण जे निर्णय घेत आहोत त्यात दोन चमत्कार घडताना दिसत आहेत. एक म्हणजे संपूर्ण पुराणात शेतकऱ्यांचा राजा म्हणता येईल असा जो एकमेव राजा होऊन गेला, ज्याला विष्णूने वामनअवतार घेऊन जमिनीत गाडला, इडा पिडा टळून ज्याचे राज्य यावे म्हणून वर्षानुवर्षे आयाबहिणी, सारे जग दिवाळीचा उत्सव साजरा करीत असताना प्रार्थना करीत आल्या आहेत त्या बळिराजाचे पुनरुत्थान.
 आणि दुसरा चमत्कार म्हणजे आयुष्यभर जिच्या वाट्याला वनवासच वनवास आला त्या सीतामाईची वनवासातून मुक्तता. सीतेने चौदा वर्षे रामाबरोबर वनवासात राहून हालअपेष्टा सोसल्या. रामाचा वनवास संपल्यानंतर त्याला राज्याभिषेक झाला, पण कुणीतरी काही आक्षेप घेतल्याने रामाने सीतेचा त्याग केला; पण त्यावेळी रामाने एवढंसुद्धा म्हटलं नाही की, "बाई, तू चौदा वर्षे माझ्याबरोबर वनवासात राहिलीस, आता एकत्र राहता येत नसलं तरी तुझ्यासाठी अयोध्येमध्ये एक महाल बांधून देतो." सीतेचा त्याग करताना इतकं तर सोडाच पण "तू गरोदर आहेस, तुझं बाळंतपण होईपर्यंत राहण्यासाठी तुला एक झोपडी बांधून देतो." एवढंसुद्धा रामाच्या तोंडून निघालं नाही. तेव्हापासून सीता अजूनही वणवण हिंडते आहे. शेतकरी महिला आघाडी आज सीतेचे मंदिर उभारून खऱ्या अर्थाने तिची वनवासातून मुक्तता करीत आहे.
 राष्ट्रीय कृषिनीतीचा स्वीकार
 या मेळाव्यामध्ये आपण पहिला निर्णय घेतो आहोत तो देशाच्या शेतीविषयक धोरणाचा. देशाचं शेतीविषयक धोरण कुणी ठरवायचं? लोकसभेमध्ये बसणाऱ्या पुढाऱ्यांनी, पंतप्रधानांनी का मंत्र्यांनी? शेतीविषयक धोरण खरं तर सरकार आणि शेतकरी दोघांनी मिळून ठरवायला हवे. यासाठी गेली दोनतीन वर्षे आम्ही खूप

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ६४