Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या सत्तेचा लाभ सर्व जनतेला करून देण्याऐवजी स्वतःच बकाबका खाण्याची दुर्बुद्धी का झाली या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे.
 त्यानंतर १९९१ साली खुली व्यवस्था आली आणि आता खुली व्यवस्थाही उपयोगाची नाही की काय अशी भीती तयार होऊ लागली आहे याचा अर्थ काय हे समजावून सांगणारा एकही अर्थशास्त्रज्ञ या देशात नाही ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. आज जी काही मंदी आलेली आहे त्यासंबंधी मी या लेखामध्ये लिहिले आहे. ही मंदीची स्थिती सुधारण्याआधी अजूनही बिघडणार आहे. हा काही खुल्या व्यवस्थेचा दोष नाही. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात सत्तेचे ताट पुढे आल्यानंतर जसे त्यांनी बकाबका खाल्ले तसेच खुली व्यवस्था आल्यानंतर आपल्यामधील 'हर्षद मेहता' किंवा 'राजू आहेर' यांनासुद्धा किती खाऊ आणि किती नको असे झाले आहे आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळून मंदीची अवस्था आणखी बिकट होणार आहे. आज फक्त कॉम्प्युटरच्या धंद्याला सुरुंग लागला आहे, यापुढे सुरुंग 'मोबाईल'च्या धंद्याला लागणार आहे असा माझा कयास आहे.
 १९९१ साली मनमोहनसिंगांनी खुली व्यवस्था आणली, शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे देशाने जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही केली. आता पुन्हा समाजवादी व्यवस्थेचे नाव कोणी घेणार नाही असे तुम्हाला वाटत असेल; पण आजच्या मंदीमुळे बेकार होऊ लागलेले लोक पुन्हा एकदा समाजवादाचा पुकारा करू लागले आहेत. गेल्या महिन्या दोन महिन्यांत समाजवादावरील पुस्तकांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. समाजवादाला पुन्हा हाक घालणारी ही मंडळी पाचव्या, सहाव्या वेतन आयोगाच्या लाभांना चटावलेली मंडळी आहेत, त्यांना शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या अधिकाधिक बिकट होत जाणार आहेत.
 आतंकवादाचा प्रश्न तर सध्याच्या परिस्थितीत कोणालाही सोडवता येण्यासारखा नाही. या देशाला 'भाईभाईवादा'चा रोग झाला आहे. कोणाशी ताठपणे बोलणे म्हणजे आम्ही काहीतरी पाप करतो आहोत, गांधीवादाशी प्रतारणा करतो आहोत अशी सत्ताधारी लोकांनी समजूत करून घेतली आहे. या भाईभाईवादामुळे १९४७ साली पाकिस्तान झाला, १९६२ साली चीन आपल्या दरवाजाशी येऊन ठेपला आणि जर का हे भाईभाईवादी पुन्हा एकदा दिल्लीच्या सत्तेमध्ये आले तर पुढच्या पाच वर्षांत ईशान्य भारत पाकिस्तानमध्ये जाण्याची आणि वायव्य भारत चीनमध्ये जाण्याची शक्यता मला स्पष्ट दिसते आहे.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१५