Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३०७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शत्रू कसे आहे हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे समजावून देण्यासाठी मी आंदोलने केली. मला आंदोलने करण्याची हौस नाही, अटक करवून घेण्याचीही हौस नाही. केवळ एक चांगला शिक्षक म्हणून मी या शेतकरी आंदोलनात पडलो. माझा हा ज्ञानयज्ञच आहे असे मी मानतो.
 तीन दिवसांचा ज्ञानयज्ञ
 अधिवेशनाच्या या तीन दिवसांत ज्या चर्चा झाल्या त्या या ज्ञानयज्ञाचाच भाग आहे. या चर्चांतून तयार झालेले ठराव सर्व मिळून फक्त सहा पानांवर उतरवून काढलेले आहेत. वरवर वाचताना एखाद्याला वाटेल की काय हे रटाळ लिहिले आहे! पण एक एक ओळ विज्ञानबुद्धीच्या भिंगाखाली धरून वाचा म्हणजे मग तुम्हाला त्या ठरावांचे महत्त्व कळेल. या काही केवळ भीमगर्जनी बाष्कळ घोषणा नाहीत. या ठरावांत काय काय आहे?
 शेतकरी संघटना सर्वच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहे. तोपर्यंत धीर धरा; एकानेही एका पैशाचीसुद्धा कर्जफेड करू नये. तुमच्या गावामधील जी विविध सहकारी सेवा संस्था आहे त्या संस्थेतून तुमच्या कर्जवसुलीच्या नोटिसा निघत असतात आणि वसुलीची अंमलबजावणी होते. या विविध सहकारी सेवा संस्थेला अशी अन्याय्य कारवाई करता येऊ नये त्यासाठी तुम्हाला जे सुचेल ते करा.
 शेतकरी संघटनेच्या ११व्या अधिवेशनाच्या या ठरावांमध्ये एरोपोनिक्स्, जैविक तंत्रज्ञान, इथेनॉल तंत्रज्ञान एवढेच नव्हे तर वायदा बाजारामध्ये भाग घेण्याकरिता गणकयंत्राधारित माहिती तंत्रज्ञान यांची माहिती आहे.
 इथेनॉल 'चरखा'
 ठराव झाल्याप्रमाणे चारपाच शेतकऱ्यांनी मिळून इथेनॉल बनवण्याची यंत्रणा चालू केली तर कदाचित पोलिस येऊन छापा घालतील; पण शेतकरी महिला आघाडीनेही कंबर कसली आहे की ज्या स्वयंपाक घरात आपण आमटीभात शिजवतो त्याच स्वयंपाकघरात इथेनॉलही बनवू शकतो, ते आपण करून दाखविणार आहोत. तिथे काही पोलिस येऊ धजणार नाही. जर का शेतकऱ्याच्या शेतात तयार होणाऱ्या शेततेलाला फक्त २१ रुपये ५० पैसे भाव आणि अरबांच्या देशांतून आयात केलेल्या तेलाला ५६ रुपये भाव असेच जर सरकारचे धोरण चालणार असेल तर स्वयंपाकघरातील चुलीवर घरोघर इथेनॉल बनविण्याचा शेतकरी महिला आघाडीने केलेला निर्धार महाराष्ट्रभर आंदोलन म्हणून चालवला जाईल. इथेनॉल कसे बनवायचे ते या अधिवेशनानिमित्त भरवलेल्या प्रदर्शनात प्रात्यक्षिकासह समजावून दिले आहे. तुम्ही शेतकरी अशिक्षित असलात तरी अडाणी नाही; तुम्ही शहाणे आहात आणि शहाण्यांनी शब्दांनी शिकायचे असते.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३०७