फक्त, तुम्हा शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येऊ नये, शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळू नये याकीरता सरकार वायदाबाजारावर बंदी आणत आहे, त्याने ती आणली आहे.
शेतीचे उत्पादन वाढवण्याकरिता माणसाने माल्थसपासून नवीन नवीन तंत्रज्ञान आणले. आज एवढ्याशा जागेत पाहिजे तितके पिकते, जमिनीचीसुद्धा गरज नाही. जैविक तंत्रज्ञानामुळे पाहिजे तसे वाण तयार होऊ शकते. तुमच्या शेतातील अगदी हिरवळीपासून इंधन तयार होऊ शकते. तुमच्या मोबाईलवरसुद्धा शेतीमालाला भाव मिळवण्याची जादूची कांडी आहे.
तर, शेती कशी करावी हे तुम्हाला औरंगाबादला शिकायला मिळेल. चारच शब्द लक्षात ठेवायचे - A, B, E, I - A म्हणजे ऐरोपोनिक्स, A म्हणजे बायोटेक्नोलॉजी, E म्हणजे इथेनॉल टेक्नोलॉजी आणि I म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी. ही चार तंत्रज्ञाने तुम्ही शिकलात तर आपल्या मायबहिणींची बळीच्या राज्याची पिढ्यान्पिढ्यांची इच्छा पुरी व्हायला वेळ लागणार नाही आणि तंत्रज्ञानची झेप इतकी मोठी आहे की आपण येथून औरंगाबादला पोचतो, की आणखी एखादे पाचवे तंत्रज्ञान उदयाला आलेले असेल कदाचित. या सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती, त्यांचा वापर आणि ज्याला आवश्यक असेल त्याला, विकत घेण्याची संधीसुद्धा औरंगाबादला अधिवेशनात मिळणार आहे.
शेतकरी संघटनेचे अधिवेशन, गावची जत्रा जशी दर वर्षी भरते तसे काही दरवर्षी भरत नाही. जेव्हा काही असे संकट येते, असा कठीण प्रसंग येतो आणि अध्यक्षांना वाटते की हा निर्णय आपल्याला किंवा कार्यकारिणीलाही करणे कठीण आहे; आपण एकट्याने निर्णय घ्यायचा धोका घेऊ नये, सगळ्या शेतकऱ्यांना बोलवावे, सगळे शेतकरी भाऊबहिणी मिळून विचारविनिमय करून या अंधारातून रस्ता कसा काढायचा ते ठरवू तेव्हा शेतकरी संघटना अधिवेशन भरवते. आतापर्यंत शेतकरी संघटनेची १० अधिवेशने होऊन गेली, हे ११ वे अधिवेशन महत्त्वाचे आहे.
तुम्ही लांबचे असा की जवळचे, तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की या ऐतिहासिक अधिवेशनाला तुम्ही काहीही झाले तरी येणे चुकवू नका. नाही तर, तुमची नातवंडे तुम्हाला हसतील आणि विचारतील, 'अरे, ते औरंगाबादचे अधिवेशन होते आणि तुम्ही गेले नव्हते?'
(६ ऑक्टोबर २००८ - मानवत. जि. परभणी)
(शेतकरी संघटक २१ ऑक्टोबर २००८)
◼◼