Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेवढे मिळाले म्हणजे मग काही करायची गरज पडणार नाही.'
 शेतकऱ्याची सर्वदूर अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत तुमच्या सगळ्यापुढे हा प्रश्न पडला आहे की, ही शेती करावी का नाही? मनामध्ये एक प्रश्न येतो की, शेती नाही पिकवली तर लोकांना खाऊ काय घालणार? शेतकरी आता शहाणे झालेत. त्यांना पटले आहे की, शरद पवार परदेशातून गहू आणून लोकांना खाऊ घालतात तर आपल्याला त्याची चिंता करण्याचे काही कारण नाही. शरद पवारांना आपली चिंता नाही तर त्यांच्या माणसांना खाऊ घालण्याची चिंता आपण कशाला करायची? तुमच्या समोर जो अत्यंत कठीण निर्णय आहे तो हा की याच्या पुढे शेती करायची किंवा नाही?
 विशेष आर्थिक विकास क्षेत्रासाठी (एस् ई झेड) तुमची जमीन जात असेल तर सरकारला ती घेऊ द्यायची का? शेतकरी संघटनेने या विषयावर भूमिका आधीच मांडलेली आहे; तो काही अधिवेशनाचा विषय नाही. ज्यांना शेती करायची आहे त्यांच्या शेतीला सरकारने बोटसुद्धा लावता कामा नये, संपादन करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या शेतकऱ्याला आता शेती करण्याची इच्छा नाही त्याला त्याची जमीन सरकार म्हणते म्हणून पाचपन्नास हजारांत दिली पाहिजे हेही जमणार नाही. बाजारात त्याची किंमत ७० लाख असेल तर सत्तर लाखाने विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला असले पाहिजे.
 प्रश्न असा आहे की या परिस्थितीत तुम्ही पुढे शेती कशी काय करणार आहात? जे शेती सोडून जाऊ इच्छितात त्यांनी शेती विकली, त्यांचे सोडून द्या; पण जे शेती करू इच्छितात त्यांनी शेती कशी करावी यावर औरंगाबाद अधिवेशनात आपण तपशीलवार चर्चा करणार आहोत. यापुढे सूर्य असा तापणार असेल आणि मेघ बाबा असा वेड्यासारखा बरसणार असेल तर आकाशाखालची शेती ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. तुम्ही गेली काही वर्षे ऐकता की इस्रायलमध्ये आता आकाशाखालची उघडीबोडकी शेती होत नाही. याच्या पुढे तुमची शेती आता मांडवाखालची शेती, आच्छादित शेती झाली तरच जगू शकते, नाही तर जगूच शकत नाही. मांडवाखालची, सावलीतली शेती करताना आपल्याला हवामान ठरवता येते, उष्णतामान ठरवता येते, पाणी ठरवता येते. अशा तऱ्हेची जर शेती केली तरच तुम्हाला शेतीमालाला भाव मिळेल. यापुढे आकाशाखालची उघडीबोडकी शेती करीत राहिलात तर तुम्ही बुडून जाल, अधिकाधिक कर्जबाजारी व्हाल आणि अजूनही मोठ्या संख्येने आत्महत्या करायला हे सरकार तुम्हाला भाग पाडेल
 तुम्हाला वाटत होते की आम्ही कशीही शेती केली आणि आपण आंदोलने

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २९२