Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जमिनीत जिरून जाऊन नामशेष होणार, योग्य वळणाने जात असेल तर अखेरी ते मुख्य प्रवाहालाच येऊन मिळणार आहे.
 शेतकरी आंदोलनाच्या मुख्य प्रवाहापासून फुटून जाण्याचा प्रकार फक्त महाराष्ट्रातच होतो आहे असे नाही. अखिल भारतीय पातळीवर तो चालूच आहे. १९८९ साली दिल्लीला भरलेल्या किसान-जवान पंचायतीला एका किसान नेत्याने मोडता घातला. ती पंचायत जर बिघडली नसती तर आज शेतकऱ्याची एकही आत्महत्या घडली नसती अशी माझी खात्री आहे. पंजाबमध्येही भारती किसान युनियनमधूनही काही मंडळी बाहेर पडली आणि त्यांनी वेगळी चूल मांडली. शेतकरी आंदोलनाच्या मुख्य प्रवाहातून फुटून वेगळ्या वळणाने जाणाऱ्या या मंडळींची भाषणे ऐकली म्हणजे लक्षात येते की ही मंडळी तीच ती १९८० सालची भाषणे करीत असतात. १९८० सालापासून आपण जी शेतीव्यवसायाच्या आतबट्ट्याच्या अर्थशास्त्राची मांडणी केली तेवढ्यापुरताच त्यांचा अभ्यास आहे; पुढे ते काहीच शिकले नाही. एवढ्या भांडवलावरच आपण शेतकऱ्यांचं नेतृत्व धकवू शकतो असा त्यांचा समज आहे. आपण त्यांना शिव्या देण्यामध्ये किंवा त्यांना नावं ठेवण्यामध्ये फारसा वेळ दवडू नये. आंबेठाणच्या शिबिरार्थीना मार्गदर्शन करताना मी प्रास्ताविक सत्रातच सांगत असे की, "तुमच्या बाजूने कोणी नाही, तुम्हाला पैसे देणारे कोणी नाही, तुम्हाला गाड्या देणारे कोणी नाही, निवडणुकीत तिकीट देणारे कोणी नाही; पण, तुमच्याजवळ दोन जमेच्या बाजू आहेत. तुम्ही जे बोलता ते निखळ सत्य आहे, कोणत्याही स्वार्थापोटी तुम्ही ते मांडत नाही आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी कटिबद्ध आहात ते स्वातंत्र्य म्हणजे इतिहासाच्या प्रवाहाची दिशा आहे आणि शेवटी, स्वातंत्र्याचाच विजय होणार आहे. कितीही हिटलर येवोत, कितीही स्टॅलिन येवोत, कितीही माओ त्से तुंग येवोत, कम्युनिझम येवोत, समाजवाद येवोत, इंदिरा गांधी येवोत - शेवटी विजय स्वातंत्र्याचा आहे. इतिहास तुमच्या बाजूने आहे." या विचारावर ज्यांची निष्ठा नाही आणि आता शेतकऱ्यांचा काळ आला आहे, त्यावर आपले नावच येणार नाही अशी ज्यांना भीती वाटते आहे त्यांची आपलं नाव इतिहासात नोंदवायची घाई चालू आहे. त्यांची मोठी करुणास्पद अवस्था होणार आहे.
 १९८० साली शेतकरी आंदोलन का उभे राहिले? १९६५ साली देशामध्ये हरित क्रांती झाली. शेतीमालाचे उत्पादन वाढले. सगळ्यांना पुरेसे अन्नधान्य तयार झाले. इतरही वस्तूंचे उत्पादन वाढले; पण उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांचे पोट भरण्याची काही सोय झाली नाही. कारण, शेतीमालाला भाव द्यायचा नाही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६२