Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकरी संघटना लोकांची गर्दी नव्हे, विचार आहे


 शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीची एक परंपरा आहे की कार्यकारिणीच्या बैठकीची सुरुवात, देशातील एकूणच राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन केली जाते. बैठकीला मी हजर असेन तर साहजिकच ती जबाबदारी माझ्यावरच टाकली जाते आणि त्या आढाव्याच्या पार्श्वभूमीवर, कार्यकारिणीच्या विषयपत्रिकेवर जे विषय असतील त्यावर, निर्णय घेण्याच्या दृष्टीने, उपस्थित सर्वजण चर्चा करतात.
 काल मी जेव्हा आजच्या या बैठकीसाठी मिरजला आलो तेव्हापासून मला असे जाणवले की सगळ्यांच्या मनात एक विषय घोळतो आहे आणि तो ठसठसता फोड एकदा फुटून जाऊ द्यावा आणि मगच आपण बोलायला उभे राहावे असे ठरवून मी काही कार्यकर्त्यांची भाषणे होऊ दिली. पाच सहा भाषणे झाल्यानंतर आता हे थांबवावे असा विचार करीत असतानाच शामराव देसाईंनी आपल्या भाषणात विषय थोडा बदलला आणि त्यामुळे मी आता सुरुवात करायला हरकत नाही असे वाटले.
 मी सरकारी नोकरीत राहिलेला माणूस. सरकारी नोकरीतला एक नियम असा आहे की कोणत्याही माणसाला नोकरीतून काढून टाकायचं झालं तर तो अधिकार ज्याने त्या माणसाला नोकरीवर लावून घेतलं असेल त्यालाच असतो, दुसऱ्या कोणाला असत नाही. शेतकरी संघटनेमध्ये येताना मी कोणाला नेमलं आहे का? कोणाजवळ असं पत्र आहे का की शरद जोशींनी मला शेतकरी संघटनेचा पाईक नेमला? जर कोणाला पाईक म्हणून मी नेमला नसेल तर त्याला त्या जागेवरून काढून टाकण्याचा अधिकार मला नाही असं मी मानत आलो. आजच्या एका वक्त्याने असा एक ठराव मांडला; पण ठराव मांडताना अध्यक्षांची परवानगी घ्यायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले नाही. एकाने ठराव मांडल्यानंतर दुसऱ्याने त्याला अनुमोदन द्यावे लागते आणि मग तो मताला

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २५८