Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वातंत्र्य आले, तिरंगा फडकला आणि गोऱ्या इंग्रजाच्या ऐवजी आमचा साहेब तिथे येऊन बसला पण धोरण तेच राहिले - शेतकऱ्याला लुटणे आणि कारखानदारीची भर करणे. गोऱ्या इंग्रजाच्या ऐवजी काळा इंग्रज आला एवढाच फरक पडला. या पापाचे पहिले धनी आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पांढरे कपडे घातले, खिशाला गुलाबाचे फूल लावले आणि राजबिंडे दिसले म्हणजे काही तो मनुष्य निरपराध झाला असे नाही - शेतीमालाला भाव मिळता कामा नये कारण समाजवादी कारखानदारी वाढायची असेल तर शेतीमध्ये तयार झालेले वरकड (Surplus) उत्पादन हे कारखानदारीकडे वळवले पाहिजे असे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या प्रास्ताविकात व्ही.टी. कृष्णम्माचारी यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे आणि हे काही पं. नेहरूंपाशी थांबले नाही, हे धोरण कायम चालू राहिले. हे धोरण पहिल्यांदाच हिंदुस्थानात सुरू झाले असे नाही. हे धोरण पहिल्यांदा स्टॅलिनने रशियात राबवले - समाजवादी कारखानदारी उभी करण्यासाठी शेतकरी एक दाणा पेरून जे हजार दाणे निर्माण करतो त्यातले नऊशे नव्याण्णव दाणे त्याच्याकडून काढून घेणे. याचा परिणाम असा झाला की समाजवादी रशियामध्ये लक्षावधी शेतकरीच नव्हे तर इतर नागरिकही भुकेने मेले. नेहरूंनी १९४७ साली केलेल्या पापाचे फळ हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या रूपाने आज पुढे येत आहे. जर का नागपूरच्या काँग्रेसमध्ये सामूहिक शेती करण्याचा नेहरूंचा प्रस्ताव मंजूर झाला असता तर रशियात ज्या प्रकारची सामूहिक शेती झाली त्याच प्रकारची सामूहिक शेती हिंदुस्थानात झाली असती आणि शेतकरी भुकेने मेले असते आणि लोकही भुकेने मेले असते. सुदैवाने, नेहरूंनी मांडलेल्या त्या ठरावाला स्वतंत्र पक्षाचे निर्माते चक्रवर्ती राजगोपालचारी, चौधरी चरणसिंग आणि पंजाबराब देशमुखांनी विरोध केला म्हणून आज आपण शेतकरी आहोत आणि ही जमीन माझी आहे असे, निदान जमीन संपादन होईपर्यंत तरी म्हणू शकतो. नेहरूंचा तो ठराव मंजूर झाला असता तर सगळ्या हिंदुस्थानचे केव्हाच वाटोळे झाले असते.
 शेतीमालाला भाव न देण्याचे धोरण राबविण्याचे पाप फक्त नेहरूंनीच केले असे नाही; इंदिरा गांधींनी तेच धोरण राबवले, राजीव गांधींनी तेच धोरण चालवले. मी हे जेव्हा १९८० साली सांगायचो तेव्हा काँग्रेसचे सगळे पुढारी म्हणायचे, "काय शरद जोशी सांगतात? नेहरूंसारखा राजबिंडा मनुष्य शेतकऱ्याला डुबवेल?"
 आता याच्याबद्दल काही वाद राहिलेला नाही. १९८६-८९ या वर्षांसाठी जागतिक व्यापार संघटनेने सगळ्या देशांकडून आकडेवारी मागवली की तुमच्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २३१