नेहरू आणि त्यांच्या वंशावळीचे पाप
शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून भाषण करताना मी 'शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो' अशी सुरुवात करतो तेव्हा सर्व शेतकरी पुरुष माझे भाऊ आणि सर्व शेतकरी महिला माझ्या मायबहिणी आहेत याचे सूचक म्हणून केलेली असते; पण साताऱ्याच्या या व्यासपीठावरून जेव्हा मी तशी सुरुवात करतो आहे तेव्हा त्याला एक विशेष अर्थ आहे. माझा जन्म साताऱ्यातला असल्याने, माझे बालपणही साताऱ्यातच गेलेले असल्यामुळे साताऱ्यातील सर्व शेतकरी स्त्रीपुरुष अधिक अर्थाने माझे बहीणभाऊ आहेत. माझ्या सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने, माझे वडील शेतकरी नव्हते, सरकारी नोकरदार होते. त्यामुळे मला शिकण्याची संधी मिळाली. माझे वडीलही शेतकरीच असते तर मलाही शेतीवरच रहावे लागले असते आणि आज या सभेच्या सुरुवातीला माझ्या ज्या भावाबहिणींनी आपल्या कर्जव्यथांच्या कैफियती सांगितल्या त्यांच्यातलाच एक म्हणून मलाही माझ्या कर्जव्यथांची कैफियत मांडावी लागली असती.
शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या या कर्जमुक्ती अभियान यात्रेची सुरुवात ५ एप्रिल २००६ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव येडे मच्छिंद्र येथून झाली. काही पत्रकारांच्या मनात प्रश्न उभा राहिला की या कर्जमुक्ती यात्रेची सुरुवात नाना पाटलांच्या गावापासून सुरू करण्याचे प्रयोजन काय? तसा काही फार जुना इतिहास नाही. इंग्रज राजवटीच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रतिसरकारच्या स्थापनेची घोषणा करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली आणि शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या सावकारांना आणि त्या सावकारांना पाठबळ देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना पकडून त्यांच्या पायांना पत्र्या मारण्याचे आंदोलन चालवले. बऱ्याच लोकांची कल्पना अशी की पायांना पत्र्या मारीत म्हणजे घोड्याबैलांच्या पायांना जसे पत्र्याचे नाल मारतात तसे नाल मारीत असावेत.