लागले आहेत हे स्पष्ट होते. त्यांच्या मनाला झोंबतं एकच - शेतकऱ्याला स्वातंत्र्य देता कामा नये. हे स्पष्ट म्हणता येत नाही म्हणून ते फक्त म्हणतात, 'जागतिक व्यापार नको, जागतिक व्यापारसंस्था नको.'
आपल्याला हे नेमकं काय होत आहे हे शांत डोक्यानं समजून घ्यायचं आहे. आपण दरदिवसाआड कार्यक्रम आणि विचार बदलणारे लोक नाहीत. नीट आठवण केली तर आपल्या हे लक्षात येईल की पंचवीस वर्षांपूर्वी शेतीच्या प्रश्नावर जे निदान मी कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर मांडलं, जे मांडण्याकरिता म्हणून नंतर विश्वनाथ प्रतापसिंगांनी मला सल्लागार म्हणून बोलावलं आणि सध्याच्या पंतप्रधानांनीही जागतिक व्यापार संस्थेच्या संदर्भात सल्ला देण्यासाठी मला बोलावलं - या सर्व वेळी माझ्या मांडणीमध्ये एका शब्दाचाही फरक पडलेला नाही.
एक दाणा पेरून शंभर दाणे पिकवणारा शेतकरी कर्जबाजारी होतो कारण शेतकऱ्याला लुटणं हा साऱ्या व्यवस्थेचा गुणधर्म आहे. शेतकऱ्यांना जगायचं असेल तर 'आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं' अशी शेती करून चालणार नाही. जात्यावर दळायला बसलं की जवळ एखादी छडी ठेवायला लागते आणि कुत्रं जर का जात्यातून पडणारं पीठ खायला येऊ लागलं तर त्याला सटका हाणायला लागतो तरच जात्यातलं पीठ तुमच्या पोराबाळांच्या आणि तुमच्या पोटात जाईल.
मी जे पंचवीस वर्षांपूर्वी सांगितलं ते घडतं आहे. शेतकरी आधी कर्जबाजारी झाला, सरकारच्या करणीनं कर्जबाजारी झाला. पण 'केलां तुकां आणि झालं माकां' अशी सरकारची अवस्था झाली आहे. शेतकऱ्याचं दिवाळं काढायला गेलेलं सरकार हळूहळू स्वतःच दिवाळखोर झालं. स्वतःची कर्ज फेडण्याची ऐपत त्याच्याकडे राहिलेली नाही; नोकरदारांचे पगारसुद्धा देण्याइतके पैसे त्याच्या तिजोरीत शिल्लक नाहीत. शेतकऱ्याला बुडवायला गेले आणि स्वतःच पाण्यात बुडले. या परिस्थितीत जे काही बदल होऊ लागले आहेत ते आपल्या समोर येऊ लागले आहेत.
फेब्रुवारी २००२ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी सांगितलं की यंदाचं वर्ष हे शेतकऱ्याचं स्वातंत्र्यवर्ष आहे. १९८० साली शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे आहे अशी घोषणा आपण पहिल्यांदा केली. १९८४ साली परभणीला भरलेल्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाची विषयपत्रिकाच 'सौराज्य मिळवायचं औंदा' अशी होती. १५ ऑगस्ट १९४७ आला आणि गेला, शेतकरी गुलामच राहिला, शेतकऱ्याचं स्वातंत्र्य अजून यायचंच आहे हे शेतकरी संघटना गेली २० वर्षे
पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१९३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १९३