राजकीय धोरण ठरवताना शेतकरी संघटनेने कोण्या पक्षांना मदत करावी, का आपला प्रभाव असेल अशा एखाद्या पक्षाची स्थापना करावी हा चर्चेचा विषय आहे. 'स्वतंत्र भारत'ची स्थापना करताना एक प्रश्न उभा राहिला की तुम्ही पक्ष स्थापन केला तरी त्या पक्षाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असेल का?
निवडणुकीचा हक्क सगळ्यांना नाही
प्रजासत्ताक भारताच्या घटनेमध्ये डॉ. आंबेडकरांनी असं लिहिलं होतं की भारत सार्वभौम लोकतंत्रवादी प्रजासत्ताक राष्ट्र आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळामध्ये त्यात 'निर्धार्मिक' आणि 'समाजवादी' असे शब्द घुसडले. त्यामुळे आता 'सार्वभौम लोकतांत्रिक निर्धार्मिक समाजवादी प्रजासत्ताक' अशी शब्दांची मोठी रांग त्यामध्ये लागली. त्या पलीकडे जाऊन निवडणुकीच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यामधील कलम २९ मध्ये अशी तरतूद ठेवली आहे की, जो राजकीय पक्ष निवडणूक लढवू इच्छित असेल त्याने घटनेवर निष्ठा व्यक्त केली पाहिजे. राजकीय पक्षाची जी काही घटना असेल, नियम-पोटनियम असतील त्यांमध्ये घटनेवरील निष्ठेचे कलम तर पाहिजेच; पण त्या पक्षाची अधिकृत नोंदणी करायची असेल, त्याला एक निवडणूक चिन्ह मिळवायचे असेल तर लोकतंत्र, समाजवाद, निर्धार्मिकता यांवर विश्वास असल्याची लेखी शपथ जाहीरपणे घ्यावी लागते. इतकेच नव्हे तर एखाद्या खाजगी उमेदवारास निवडणुकीस उभे राहायचे असेल तर त्यालाही घटनेमधील या मूल्यांवर आपली निष्ठा असल्याचे आपल्या उमेदवारी अर्जामध्ये शपथपूर्वक लिहून द्यावे लागते. तात्पर्य : लोकशाही, समाजवाद, निर्धार्मिकता यांवर विश्वास व्यक्त केल्याशिवाय कोणाही व्यक्तीस किंवा पक्षाच्या उमेदवारास निवडणूक लढविताच येत नाही. या तरतुदीचा परिणाम काय झाला?