Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सोयीस्कर हलर असला तर मी त्याच्याकडे जाईन आणि तांदूळ घेऊन जवळ शेजारच्या गावात भाव बरा असला तर तिथं जाईन. चंद्रपूरला जावंसं वाटलं तर तिथं जाईन आणि चांगला भाव मिळत असेल तर माझा तांदूळ घेऊन मी लंडनला नाहीतर न्यूयॉर्कलासुद्धा जाईन. तांदूळ विकायला कुठं जायचं ते मी ठरवणार आहे, ते ठरवणारं सरकार नाही.
 लायसेन्स काढायला माझी हरकत नाही; पण मी हलर बसवल्यानंतर जो कोणी त्या कामावरचा साहेब असेल त्याने आपला इन्स्पेक्टर पाठवावा आणि सांगावं की गिरणी काढलीत ना मग सरकारी नियमाप्रमाणे रजिस्ट्रेशन फी काय पाचदहा रुपये आहे तेवढी द्या. असा एखादा हलर वगैरे चालू केला आणि तिथं साहेब रजिस्ट्रेशन फी मागायला आला तर अवश्य द्यावी पण साहेबाकडे पनवानगीसाठी अर्ज करायला जाऊ नये.
 भातवाल्यांचं आंदोलन होत नाही, होत नाही असं आपण बरीच वर्षे म्हणत आलो आहेत. परवा अंदाजपत्रकासंबंधी दिल्लीला जी चर्चा झाली त्या चर्चेनंतर साधारणपणे शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत यासंबंधी वित्तमंत्रालयाने दिलेल्या बातम्या आज सगळ्या वर्तमानत्रांमध्ये आहेत आणि त्यात ज्या काही पंधरावीस गोष्टी शेतकऱ्यांना पाहिजे आहेत असे लिहिले आहे त्यात एक नंबरची गोष्ट आहे 'भातावरची लेव्ही रद्द करावी' ही मागणी. भातावरील लेव्ही रद्द होईल अशी माझी जवळजवळ खात्री आहे. आपल्या आंदोलनाची आरोळी ठोकल्याबरोबर काय परिणाम झाला बघा. तेव्हा, आता पाऊल पुढेच टाका.
 आणि माझ्या, कापूस उत्पादक भावांनो, शेजारच्या राज्यात चांगला भाव मिळत असेल तर कापूस तिथं न्या आणि भाव मिळवा.
 काही ठिकाणी पोलिस थांबवायचा प्रयत्न करतात. का? अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी पोलिसांनी दुसऱ्या राज्यात जाणारा कापूस थांबवायचा प्रयत्न केला; पण त्या पोलिसांची इच्छा काय होती? शेजारच्या राज्यात आम्ही कापूस नेऊ नये अशी त्यांची इच्छा नव्हती; ट्रकभर कापूस नेत असलात आम्हाला ५००० रुपये द्या, टेंपो नेत असाल तर जो काही २०००, ३००० भाव आहे तितके पैसे द्या. बैलगाडी असेल तर ५० रु. द्या, ५० नसतील तर खिशात काय ५/१० रुपये असतील ते द्या आणि तेही नसतील तर तुमच्या खिशातली एक बिडीतरी काढून द्या, एवढीच त्यांची इच्छा. म्हणजे, त्यांचा हेतू कापसाची वाहतूक थांबवणे हा नाही, तर रस्त्यावर संध्याकाळी एकटादुकटा प्रवासी पाहून त्याच्यावर हल्ला करणारे दरोडेखोर जसे असतात, तसेच हे गणवेशातले दरोडेखोर आहेत.
 मी इथे हजर असलेल्या माझ्या पोलिसभावांना आणि अधिकाऱ्यांना विनंती

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १०१