रक्षिलेल्या भूमीतच विद्याकलांचा विकास होऊ शकतो, हे व्यासवचन अक्षरशः खरे आहे. महाभारतात क्षात्रधर्माचे महत्त्व सांगितले आहे ते एवढ्यासाठीच. 'ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलांत इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा अंतर्भाव होतो', 'राजा हाच लोकांच्या धर्माने मूळ आहे', 'राजा हा प्रजेचे प्रौढ असे अंतःकरणच होय', 'राजा जेव्हा योग्य प्रकारे दण्डनीतीचा अवलंब करतो तेव्हाच कृतयुग निर्माण होते', 'राजा कालस्य कारणम्' अशा तऱ्हेची शेकडो वचने महाभारतात सापडतात, त्यांतील अभिप्राय सर्वस्वी खरा आहे, हे ग्रीस, रोम, पोलंड इ. पाश्रात्य देशांच्या इतिहासावरून स्पष्ट होईल. त्यांचे स्वराज्य गेले तेव्हा त्याबरोबर त्यांची संस्कृतीही अस्तास गेली. तेव्हा संस्कृतीच्या इतिहासात राजशासनाच्या इतिहासाला व राजकीय संस्कृतीला अग्रस्थान दिलेच पाहिजे यात शंका नाही. आणि सर्व मोठमोठ्या इतिहासवेत्त्यांनी ते दिलेही आहे. पूर्वसूरींचा तोच मार्ग अनुसरून प्रत्येक कालखंडाचे विवेचन करताना प्रथम राजशासनाचा व राजकीय संस्कृतीचा विचार या ग्रंथात करण्याचे धोरण आखले आहे. त्या अन्वये इ. पू. २३५ ते इ. स. १३१८ हा जो पहिला कालखंड त्यातील महाराष्ट्रावरील राजसत्तांचा आता प्रथम विचार करावयाचा आहे. त्यांपैकी सातवाहन सत्तेचा विचार गेल्या प्रकरणात आपण केलाच आहे. आता नंतरच्या वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य व यादव यांच्या राजशासनांचा विचार करावयाचा आहे.
पाच राजघराणी
वाकाटक घराण्याचा मूळ संस्थापक विन्ध्यशक्ती हा विष्णुवृद्धगोत्री ब्राह्मण असून तो बहुधा सातवाहनांचा एक सेनाधिकारी असावा. सातवाहन साम्राज्य विलयास गेल्यावर त्याने इ. स. २५० च्या सुमारास विदर्भामध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्याच्या या वाकाटक घराण्याने इ. स. ५५० पर्यंत म्हणजे सुमारे तीनशे वर्षे राज्य केले. उत्तरेत बुंदेलखंडापासून दक्षिणेत हैदराबादपर्यंत वाकाटक साम्राज्याचा त्याच्या वैभवाच्या काळी विस्तार झाला होता. कोसल, मेकल, मालव, कुंतल, अश्मक, मुलक एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर त्यांची सत्ता पसरली होती. कोसल म्हणजे अर्वाचीन छत्तीसगड. यात रायपूर, दुर्ग, बिलासपूर या जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो. मेकल हा अमरकंटकाच्या भोवतालचा प्रदेश. मालव हा माळवा उज्जयनी प्रांत होय. कुंतल म्हणजे सातारा, कोल्हापूर, इ. दक्षिण महाराष्ट्राचा भाग होय. अश्मक, मूलक म्हणजे औरंगाबाद, नगर हा प्रदेश होय. वाकाटकांचा शेवटचा राजा हरिषेण याचे राज्य उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतलापर्यंत आणि पूर्वपश्चिमेस गंगासागर व सिंधू- सागर यांच्यापर्यंत पसरले होते.
वाकाटकांच्या नंतर महाराष्ट्रावर बदामीच्या चालुक्यांची सत्ता प्रस्थापित झाली. जयसिंह हा चालुक्यांचा मूळपुरुष होय. हे मानव्यगोत्री क्षत्रिय घराणे होते. बदामीच्या
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
७२