Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
७०
 

काठेवाड, कोकण, चांदा, अकोला, गोदावरी, कृष्णा (आंध्रातील जिल्हे) या सर्व जिल्ह्यांतून विपुल प्रमाणात सापडली आहेत. त्यावरून रुद्रदाम्याचे आक्रमण परतवून याने पुन्हा सातवाहनसत्ता सर्वत्र प्रस्थापित केली असे दिसते. याच्या काही नाण्यांवर अश्वचिन्हही आहे. त्यावरून याने अश्वमेध केला असावा असे पंडित म्हणतात.
 या सम्राटाच्या कारकीर्दीत सातवाहनसत्तेला उतरती कळा लागली. आता हा वंश थकला होता. सतत सव्वाचारशे वर्षे एका कुळात कर्ते पुरुष निर्माण होणे ही गोष्ट फार दुर्मिळ असते. इतकी वर्षे एकसारखे थोर पराक्रमी सम्राट निर्माण झाले हेच जास्त होय. आता निसर्गक्रमाने उद्भवणाऱ्या विघटक शक्ती प्रबळ होऊ लागल्या. सातवाहनांच्या शाखोपशाखांतील भाऊबंदांनी वऱ्हाड, कुंतल येथे स्वतंत्र राज्ये स्थापिली. आभीर ही एक नवीच जमात या वेळी वर उसळली व तिने सातवाहन- साम्राज्याचे लचके तोडण्यास प्रारंभ केला. आंध्रातील इक्ष्वाकू हे सातवाहनांचे सरदार होते, तेही आता स्वतंत्र झाले. अशी सर्व बाजूंनी पोखरणी लागल्यामुळे पुढील ३०/३५ वर्षे प्रतिष्ठानला सातवाहनसत्ता अस्तित्वात होती, तरी ती फार मर्यादित व निष्प्रभ अशी होती. इ. स. २२५ च्या सुमारास तीही नष्ट झाली व चारसाडेचार शतके अव्याहत चाललेल्या या पहिल्या महाराष्ट्र साम्राज्यसत्तेचा अंत झाला.

अमर काव्य
 सातवाहन घराण्याचा मूळ संस्थापक राजा सातवाहन आणि त्या राजघराण्यातील पहिला सातकर्णी, दुसरा सातकर्णी, हालराजा, गौतमीपुत्र सातकर्णी यांच्याविषयी अनेक अद्भुतरम्य कथा भारतात रूढ झालेल्या आहेत. बृहत्कथा, कथासरित्सागर, पुराणे, लीलावईसारखी काव्ये या वैदिकपरंपरेतल्या साहित्यात त्या आहेतच, पण जैन, बौद्ध यांच्या वाड्ययातही सातवाहनांविषयीच्या अनेक रम्यकथा आढळतात. पण येथपर्यंत सांगितलेल्या त्यांच्या इतिहासावरून असे ध्यानात येईल की तसल्या काल्पनिक अवास्तव कथा पूर्णपणे वगळल्या तरी सातवाहन घराण्याचे चरित्र हे एक अद्भुतरम्य काव्य वाटावे इतके त्या राजपुरुषांचे पराक्रम अलौकिक आहेत. दक्षिणेत पहिली साम्राज्यसत्ता त्यांनी स्थापिली, शकपल्हव या आक्रमकांचे पुनःपुन्हा निर्दाळण करून दक्षिणेतून त्यांना निरवशेष करून टाकले, आपल्या साम्राज्याच्या मर्यादा उज्जयिनी, साची येथपर्यंत नेऊन भिडविल्या, साडेचारशे वर्षे हा साम्राज्यभार आपल्या मस्तकावर पेलून धरण्याचे सामर्थ्य असलेले कर्ते पुरुष महाराष्ट्राला दिले आणि राजसत्तेची स्थापना, धर्माचे पुनरुज्जीवन, विद्याकलांचे संवर्धन, कृपिव्यापारधनसमृद्धी यायोगे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा पाया घातला, ही कृत्ये कमी अद्भुत आहेत काय ? कोणत्याही महाकवीला अमर काव्य निर्मिण्याची स्फूर्ती व्हावी असे हे पराक्रम आहेत. त्या पराक्रमांची स्मृती मनात घोळत ठेवूनच पुढील काळच्या महाराष्ट्राच्या राजघराण्यांचा इतिहास आपण आता पाहू.

*