Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
६८
 

होती. मधूनमधून यांच्यातील अंतराची आग भडकत असे आणि मग यांच्या पाशवी शक्तीचे उद्रेक होऊन जग कंपायमान होई. इ. स. पूर्व पहिल्या शतकात हूणांची टोळधाड कुशाणांवर व त्यांची शकांवर कोसळून शक हे लाव्हाच्या लोंढ्यासारखे भारतात घुसले. त्यांच्या मागोमाग कुशाण हेही आत लोटले व त्यांनी उत्तर भारतावर सम्राज्यच स्थापन केले. शकांना साम्रज्यस्थापनेची ऐपत नव्हती. ते भारतात आधी आले, पण कुशाणांचे ते क्षत्रप–सरदार, सुभेदार म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्यातील एका क्षहरातवंशीय भूमक नावाच्या क्षत्रपाने प्रथम काठेवाड, गुजराथ व पश्चिम रजपुताना या प्रदेशात आपली सत्ता स्थापन केली नव्हती. नहपान हा याचा मुलगा किंवा वंशज होता. हा व याचा जावई उपवदात ( ऋषभदत्त ) यांनी आपली सत्ता पुष्कळच वाढविली. त्यांनी माळवा आक्रमिला, नर्मदेचे खोरे जिंकले व ते महाराष्ट्रात उतरले. या वेळी म्हणजे इसवी सन १२५ च्या सुमारास मंदालक, पुरींद्रसेन हे प्रतिष्ठानच्या गादीवर असलेले सातवाहन राजे दुबळे होते. त्यामुळे वऱ्हाड, कोकण, कुंतल या भागांवर शकसत्ता स्थापन झाली. नहपान हळूहळू जुन्नर, कार्ले येथपर्यंत घुसला. दोन्ही ठिकाणी त्याचे शिलालेख आहेत. त्यांत त्याने मिळविलेल्या या यशाचा खूपच गौरव केलेला आहे.
 शककुशाणांच्या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. यांना स्वतःची अशी संस्कृती व धर्म नव्हता. त्यामुळे भारतात येताच ते बौद्ध व वैदिक धर्माचे अनुयायी होत. कुशाणसम्राट कनिष्क हा बौद्ध होता व त्याचा नातू वासुदेव हा परमभागवत म्हणवून घेण्यात भूषण मानीत असे. नहपानाचा जावई याने ऋषभदत्त है हिंदू नाव स्वीकारले होते व तो पौराणिक हिंदुधर्माचा कट्टा पुरस्कर्ता होता. त्याने अनेक गावे ब्राह्मणांना दान दिली, लक्ष भोजने घातली, पुष्करतीर्थात स्नान करून गोप्रदाने दिली, असे उल्लेख त्याच्या शिलालेखांत आहेत. बौद्धांनाही त्याने अशाच उदार देणग्या दिल्या होत्या. यामुळे त्याची सत्ता जास्तच दृढ झाली आणि क्षणभर सातवाहन साम्राज्य नष्ट होणार व अखिल भारत परकीयांच्या सत्तेखाली जाणार अशी चिन्हे दिसू लागली. पण सातवाहनकुलात गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला व हे भयावह संकट टळले.

शकपल्हवनिपूदन
 साधारणतः इ. स. ३५ ते ९० ही पन्नासपंचावन्न वर्षे महाराष्ट्र शक सत्तेखाली होता. इ. स. ७२ साली गौतमीपुत्र प्रतिष्ठानच्या गादीवर आला व पहिली पंधरासोळा वर्षे तयारीत घालवून नंतर त्याने शकांवर चढाई करण्यास प्रारंभ केला. प्रथम त्याने पुणेप्रांत, मावळ प्रांत मोकळा केला व मग उत्तरेस स्वारी करून रणांगणावर त्याने नहपान व उषवदात या दोघांनाही कंठस्नान घातले आणि मग दक्षिणेत जेवढे म्हणून शक, यवन, पल्हव होते त्यांच्या एकतर त्याने कत्तली केल्या किंवा त्यांना उत्तरेत पिटाळून लावले. यवन हे बौद्ध झाले होते. साहजिकच त्यांचा ओढा या परकीयांकडे होता. त्यामुळे त्यांचेही गौतमीपुत्राने निर्मूलन केले. या विजयानंतर लगेच