Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७९६
 

साली मानापमान नाटक लिहिले आणि नाट्यसंगीतात नवयुग सुरू झाले. त्यांनी गोविंदराव टेंबे यांच्याकडून हिंदुस्थानी संगीताच्या चाली घेतल्या. त्यामुळे नाट्यसंगीताला प्रौढ व भारदस्त वळण मिळाले. असे हे संगीत बालगंधर्वांच्या कंठातून ऐकावयास मिळाल्यामुळे रंगभूमीवर स्वर्गच अवतरल्यासारखे झाले. गायनाला त्यांनी हृदयस्पर्शी अभिनयाची जोड दिली, त्यामुळे स्वप्नसृष्टीचाच आस्वाद रसिकांना वर्षानुवर्षे मिळत राहिला. देवल, खाडिलकर यांसारखे नाट्यशिक्षक व बखलेबुवांसारखे संगीत मार्गदर्शक त्यांना लाभले. त्यांनी उत्तम श्रेष्ठ संगीतनटांचा संग्रहही केला. पटवर्धनबुवा, मा. कृष्णराव, पंढरपूरकरबुवा, नेवरेकर, लोंढे यांसारख्या संगीत नटांचा उदय त्यांच्याच कंपनीत झाला. केशवराव भोसले हे तिसरे प्रख्यात संगीत नट, बाबूराव पेंढारकर हे त्यांचेच सहकारी. 'ललितकला' ही संगीत संस्था त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालली होती. गंधर्व आणि ललितकला यांनी १९२१ साली मानापमान नाटकाचा संयुक्त प्रयोग केला. मराठी रंगभूमीच्या सुवर्णयुगाचा तो कलशाध्याय समजला जातो. पुढील काळात बलवंत, यशवंत, इ. नाट्यसंस्थांनी आपल्या संगीतासाठी वझेबुवा या संगीतज्ञांचे साह्य घेतले. आणि त्यातून सरनाईक, मा. दीनानाथ हे नट उदयास येऊन खानदानी संगीताचे लोण सर्व महाराष्ट्रभर पोचले. स्वयंवर, द्रौपदी, राक्षसी महत्त्वाकांक्षा, विद्याहरण, संन्याशाचा संसार, शहाशिवाजी, सत्तेचे गुलाम, एकच प्याला, भावबंधन इ. नाटके या काळात जुन्या आणि या नव्या संगीत नटांनी अत्यंत लोकप्रिय केली.
 १९३१ नंतर सिनेमामुळे मराठी रंगभूमीला उतरती कळा लागली. त्या वेळी प्र. के. अत्रे यांनी तिला सावरून धरली. 'बालमोहन' नाटक मंडळी त्यांची नाटके करीत असे. त्यातूनच छोटा गंधर्व हा नामवंत कलाकार पुढे आला. १९४० साली अत्रे बोलपटसृष्टीत गेले. तेव्हा रांगणेकरांनी रंगभूमी सावरली. माफक संगीत असलेली नाटके त्यांनी लिहिली. त्यांतील 'कुलवधू' हे नाटक, सौ. जोत्स्ना भोळे यांची भूमिका व त्यांनी गायिलेली पदे यामुळे, अत्यंत लोकप्रिय झाले. आणि त्यावरोवर 'नाट्य निकेतन' या रांगणेकरांच्या संस्थेलाही स्थैर्य आले. सौ. जोत्स्ना भोळे यांचे खादिम हुसेन खां, इनायत खां, वझीर खां, धम्मण खां हे संगीत क्षेत्रातले गुरू होत... 'नाट्यमन्वंतर' च्या रंगभूमीवर त्या प्रथम पुढे आल्या. त्यानंतर 'नाट्यनिकेतन' च्या त्या नायिकाच झाल्या. त्यांच्या असामान्य मधुर गायनामुळे पुढे त्यांचा खूप गौरव झाला. भारताच्या सांस्कृतिक पथकावरोवर त्या चीनला गेल्या होत्या. दिल्ली, लखनौ येथील रेडिओवरील संगीतोत्सवात त्यांना नेहमी मानाचे स्थान असे. कलकत्ता संगीत परिषदेतही त्यांचा गौरव झालेला आहे. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात तिला अशी गायिका नटी म्हणून मिळाली हे तिचे भाग्यच होय.