Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९३
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

अब्दुल करीम खां यांसारखे भारतीय कीतांचे थोर गवईही त्यांना मानीत असत. बावलीबाईंच्या मैफली अनेक संस्थानिकांच्या दरबारी झालेल्या आहेत. पुढे त्या भावनगर संस्थानच्या दरबारी गायिका म्हणून राहिल्या. आयुष्याच्या उत्तर काळी त्या भजने म्हणू लागल्या. ती इतकी प्रासादिक व रसाळ असत की श्रोते तल्लीन होऊन जात.
 अंजनीबाई मालपेकर यांनी एका काळी सर्व भरतखंडात आपले नाव असेच गाजविले होते. भारतातील असे एकही मोठे देऊळ नाही की जेथे त्यांचे गायन झालेले नाही. असा एकही मोठा संस्थानिक नाही की ज्याच्या दरबारात त्यांची मैफल झालेली नाही. नेपाळ, पालनपूर, इंदूर, ग्वाल्हेर येथे तर त्यांच्या मैफली अनेकवार झाल्या आहेत. वयाच्या आठव्या वर्षापासून त्या गायन शिकत होत्या. नजीर खां भेंडीबाजारवाले हे त्यांचे गुरू. त्यांच्याजवळ त्या छत्तीस वर्षे गानतपस्या करीत होत्या.
 सुरश्री केसरबाई केरकर यांना एकाच गुरूच्या हाताखाली शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अब्दुल करीम खां, वझेबुवा, खांसाहेब बरकतुल्ला, पं. भास्करबुवा बखले आणि मुख्यतः अल्लादिया खां अशा भिन्न गुरूंच्या जवळ, त्यांच्या गावी राहून, त्यांना संगीतकला शिकावी लागली. यासाठी त्यांना अपार कष्ट करावे लागले. गैरसोयी सोसाव्या लागल्या. पण हे सर्व त्यांनी सोसले आणि संगीतकलेत अग्रपूजेचा मान मिळविला. भारत सरकारनेही त्यांच्या या कलेचा गौरव केला आहे. त्यांचे सबंध चरित्र म्हणजे संगीताचा जोगवा घेतलेल्या एका योगिनीच्या संगीतसाधनेचा इतिहास आहे.
 मोगुबाई कुर्डीकर यांची कीर्ती व गानतपस्या अशीच असामान्य आहे. गाणे शिकायला मिळावे म्हणून प्रथम त्यांनी नाटकात कामे केली. 'सातारकर संगीत मंडळी' मध्ये त्या गेल्या. तेथे रामलाल नावाच्या गवयाने शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण त्यांना दिले. त्या आपल्या घरी गाणे म्हणत असताना अल्लादिया खां रस्त्यावरून जात होते. तो सुरेल कंठ ऐकून ते इतके भारावले की ओळख नसताना ते तसेच वर गेले आणि मोगुबाईंना त्यांनी आपल्या शिष्या करून घेतले. मध्यंतरी हैदर खां हे अल्लादिया खांचे बंधू यांच्याजवळ त्या शिकत होत्या. पण नंतर पुन्हा अल्लादिया खांकडे त्या आल्या व शेवटपर्यंत त्यांच्याजवळ राहून त्यांची विद्या त्यांनी अभ्यासली. मोगुबाईंच्या एका गाण्याच्या मैफलीला स्वतः येऊन अल्लादिया खांनी मुक्त कंठाने त्यांची स्तुती केली.
 हिराबाई बडोदेकर या गायिका म्हणून अखिल भारतात ख्यातनाम आहेत. प्राथमिक शिक्षण चालू असतानाच अब्दुल वहीद खां यांच्याकडे त्या संगीताचे पाठ घेऊ लागल्या. पुढे त्यांनी इतकी कीर्ती मिळविली की कलकत्ता, अलाहाबाद येथील संगीत परिषदांमध्ये त्यांचा मोठा गौरव झाला. त्यांनी स्वतःची नाटक कंपनी काढून नाट्यसंगीताचीही सेवा केली आहे. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला, तेव्हा दिल्ली