धोरण टेविले. त्यामुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. 'समाजस्वास्थ्य' हे र. धों. कर्वे यांचे मासिक अगदी निराळ्या विषयाला वाहिलेले होते. संततिनियमन हा विषय उच्चारणे हे सुद्धा जेव्हा पाप होते तेव्हा ते त्याचा धडाडीने प्रचार करीत होते. आणखी असेच स्त्रीपुरुषसंबंधविषयक लेख त्या वेळी ते छापीत असत. गोमंतक त्यावेळी पारतंत्र्यात होता. तरी दादा वैद्य, हेगडे, देसाई, द. व्यं. पै, सां. घ. कंटक यांनी प्राचीप्रभा, हिंदू, सुबोध इ. नियतकालिके चालवून मराठी बाणा तेथे टिकवून धरण्याची मोलाची कामगिरी केली.
साहित्यसमीक्षा हाही विचारप्रधान वाङ्मयाचाच एक भाग आहे. मराठीतले पहिले साहित्यसमीक्षक म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे होत. त्यांची मुख्य कामगिरी म्हणजे पाश्चात्य समीक्षापद्धती व तत्त्वे मराठीत आणणे ही होय. 'संस्कृत कविता' या त्यांच्या पुस्तकात शाकुंतलासारख्या संस्कृत विदग्ध साहित्याचे त्यांनी या नव्या पद्धतीने समीक्षण केले आहे. तोपर्यंत मराठीला ही पद्धती ठाऊकच नव्हती. अर्थबोध करून देणे व काही अलंकार सांगणे यापलीकडे मल्लीनाथासारखे टीकाकारसुद्धा जात नसत. कथानक, स्वभावलेखन, निसर्गवर्णन, वास्तवता, कल्पनारम्यता, आत्माविष्कार, जीवनदर्शन यांचा विचारही जुने शास्त्रीपंडित करीत नसत. यासाठी विष्णुशास्त्री यानी त्यांच्यावर टीका केली आहे आणि पाश्चात्य पंडितांनी आमच्या जुन्या साहित्याचे परीक्षण केले नसते तर, आम्हांस त्याचे सौंदर्य समजलेच नसते, असे म्हटले आहे. संस्कृत कवितेच्या समीक्षणाशिवाय विष्णुशास्त्री यांनी शेक्सपियरची नाटके, मोरोपंतांची कविता यावरही टीकालेख लिहिले आहेत आणि 'विद्वत्त्व आणि कवित्व' यांसारखे तत्त्वचर्चात्मक लेखही लिहिले आहेत.
दुसरे टीकाकार म्हणजे श्री. कृ. कोल्हटकर हे होत. त्यांच्या लेखसंग्रहात त्यांनी केलेली समीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. वा. म. जोशी यांनी टीकालेखन थोडे केले. पण त्यांची दृष्टी मार्मिक व रसग्राही असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.
त्याच काळातले प्रसिद्ध साहित्यविवेचक म्हणजे तात्यासाहेब केळकर हे होत. 'हास्यविनोदमीमांसा' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पण त्याशिवाय त्यांनी अनेक साहित्यकृतींचे परीक्षण केले आहे व अनेक संग्रहांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. 'वाङ्मय म्हणजे काय' हा त्यांचा विवेचक लेख फार प्रसिद्ध आहे. रा. श्री. जोग हे साहित्यानंदाची व सौंदर्याची मीमांसा करणारे समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. 'सौंदर्यशोध व आनंदबोध' हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजलेला आहे. त्यात त्यांनी आनंदाच्या स्वरूपाची मीमांसा केली आहे, काव्यानंद हा निःस्वार्थी, उदात्त व अपार्थिव आहे. असे ते मानतात. श्री. के. क्षीरसागर हे 'सत्यम्- शिवम्- सुंदरम्'चा पुरस्कार करणारे आहेत. 'टीका-विवेक' हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांच्या मते कला हा एक