सामाजिक परिवर्तनाचे श्रेय ग्रंथाइतकेच किंबहुना थोडे जास्तच वृत्तसाहित्याला आहे. वर सांगितल्यापैकी अनेक लेखकांचे निबंध प्रथम वृत्तपत्रे व नियतकालिके यांतूनच प्रसिद्ध झालेले आहेत. यावरून या साहित्याचे महत्त्व किती आहे ते कळून येईल.
अशा या वृत्तसाहित्याचे आता वर्णन करावयाचे आहे. यांतील काही वृत्तपत्रांचे व त्यांतील लेखनाचे वर्णन मागील अनेक प्रकरणांतून या ना त्या कारणाने येऊन गेले आहे. त्याचा निर्देश फक्त येथे केला आहे. इतरांचा परिचय थोडा विस्ताराने दिला आहे. त्यातही निवड करताना विशेष प्रसिद्ध व नामांकित अशाच नियतकालिकांची निवड केली आहे. महाराष्ट्र संस्कृतीचे स्वरूप दाखविणे एवढाच यात हेतू आहे. सर्व इतिहास देणे हा नाही.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या 'दर्पण' व 'दिग्दर्शन' या वृत्तपत्रांचा उल्लेख मागे आलाच आहे. त्यांच्या कार्याचे महत्त्वही येथे स्पष्ट केले आहे. १८४१ साली भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर' हे पत्र सुरू केले. लोकहितवादींची 'शतपत्रे' यातूनच प्रसिद्ध झाली. या पत्राचा विशेष म्हणजे इंग्रजी राज्यपद्धतीवर टीका प्रथम याच पत्रात सुरू झाली. १८४२ मध्ये अमेरिकन मिशनऱ्यांनी 'ज्ञानोदय' हे पत्र अमहदनगर येथे सुरू केले. ख्रिस्ती धर्माचा प्रसार हा त्याचा हेतू असून त्यात हिंदुधर्मातील रूढींवर व आचारांवर कडक टीका येत असे. पण त्यामुळे हिंदुपंडित हे अंतर्मुख होऊन स्वधर्माचा विचार करू लागले, हा या पत्राचा मोठाच उपयोग झाला.
१८४९ साली 'ज्ञानप्रकाश' हे प्रसिद्ध वर्तमानपत्र सुरू झाले. कृष्णाजी त्र्यंबक रानडे हे त्याचे पहिले संपादक. प्रथम ते फक्त सोमवारी निघत असे. पुढे सोमवारी व गुरुवारी ते निघू लागले आणि १९०४ साली ते दैनिक पत्र झाले. कृष्णशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी, छत्रे, न्या. मू. रानडे इ. अनेक पंडित त्यात लिहीत असत. देशातील व परदेशातील वर्तमान तर त्यात येत असेच. पण शिवाय स्त्रीशिक्षण, देशी उद्योगधंदे, व्यापार, कर इ. विषयांची चर्चाही त्यात येत असे. 'ज्ञानप्रकाश' हे सुधारक पक्षाचे वर्तमानपत्र होते. 'ज्ञानप्रकाशा' नंतरचे महत्त्वाचे पत्र म्हणजे 'इंदुप्रकाश' हे होय. विष्णुशास्त्री पंडित यांनी मुंबईस ते १८६२ साली सुरू केले. त्यात इंग्रजी व मराठी असे दोन विभाग होते. विष्णुशास्त्री पंडित यांनी या पत्रात विधवाविवाह, बालविवाह, केशवपन, स्त्रीशिक्षण इ. विषयांवर आवेशपूर्ण लेख लिहिले. त्यामुळे 'इंदुप्रकाश' महाराष्ट्रात फार गाजले. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्याची कामगिरी फार मोलाची आहे. १९०२ पासून ते दैनिक स्वरूपात निघू लागले. पण १९२५ साली ते बंद पडले. १८६३ साली वि. ना. मंडलीक यांनी 'नेटिव्ह ओपिनियन' हे इंग्रजी-मराठी पत्र सुरू केले. त्यातील लेख भारदस्त व अभ्यासपूर्ण असत.
१८६६ मध्ये ठाणे येथे काशिनाथ धोंडो फडके यांनी 'अरुणोदय' नावाचे पत्र सुरू केले. त्यांनीच पुढे 'हिंदुपंच' हे विनोदी पत्रही सुरू केले. त्यात प्रचलित राजकीय घडामोडींची व्यंगचित्रे असत. पत्रात अभ्यासपूर्ण लेख नसत. पण जहाल
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८०५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७९
विचारप्रधान साहित्य