त्यांनी सांगितले आहे. देशाभिमान ही वृत्तीच आपल्याकडे नाही, ती इंग्रजांपासून आपण घेतली पाहिजे, असा उपदेश त्यांनी केला आहे आणि सर्व लोकांच्या अंगी तो बाणविण्यासाठी सुशिक्षित लोकांनी ग्रंथरचना केली पाहिजे, असे परोपरीने सांगितले आहे. वाणी आणि लेखणी या दोन शस्त्रांवर त्यांची अपार श्रद्धा होती. फ्रान्समध्ये रूसो, व्हॉल्टेअर यांनी लेखणीने जे घडविले ते येथील सुशिक्षितांनी त्याच पद्धतीने घडवावे, असे सांगण्याइतका निबंध- ग्रंथ या साहित्यावर त्यांचा विश्वास होता.
आगरकर व टिळक यांनी त्यांच्यापासूनच स्फूर्ती घेतली होती. म्हणूनच न्यू इंग्लिश स्कूल, केसरी हे उद्योग त्यांनी एकत्र केले. केसरीचे पहिले संपादक आगरकरच होते. टिळकांशी त्याचे पटेना म्हणून त्यांनी 'सुधारक' पत्र काढले. या दोन पत्रांतले लेखनिबंध हेच त्यांचे मुख्य लिखाण.
समाजसुधारणा, आणि त्यातही स्त्रीसुधारणा यांवर आगरकरांचा मुख्य भर होता. तरीही त्यांचे राजकारण जहालच होते. इंग्रज हा या देशाचा शत्रू आहे, त्याचे अंतरंग काळेकुट्ट आहे, तो आर्थिक शोषणासाठीच राज्य करीत आहे, यांविषयी त्यांना शंका नव्हती; व तसे लेखही त्यांनी लिहिले आहेत. पण धार्मिक व सामाजिक सुधारणा हा त्यांचा मुख्य विषय होता. जुन्या सामाजिक व धार्मिक रूढींची अगदी चीरफाड करून, देव- कल्पना पिशाच्च- कल्पनेपासून निघाली आहे, वर्णसंकर हितावह आहे, स्त्रीपुरुषांना एकच शिक्षण व तेही एकत्र दिले पाहिजे, स्वयंवर हीच विवाह- पद्धती उत्तम, असले सिद्धांत त्यांनी मांडले आहेत. ते अज्ञेयवादी होते व 'मानवतेचे ऐहिक सुखवर्धन' हा ते धर्म मानीत असत. बुद्धिवाद हा त्यांचा आत्मा होता. नवीन विचार सांगण्यास जुन्या शास्त्रांचा आधार घेणे त्यांना मुळीच मान्य नव्हते. 'इष्ट असेल ते बोलणार' व 'शक्य असेल ते करणार' असा त्यांचा बाणा होता. 'मनुष्य- सुधारणेची मूलतत्त्वे', 'आमचे काय होणार ?', 'सुधारक काढण्याचा हेतू', 'गुलामांचे राष्ट्र', 'जात का करीत नाही ?', 'हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ?', 'फेरजमाबंदी व लष्करी खर्च', 'सामाजिक सुधारणा आणि कायदा', 'मूळ पाया चांगला पाहिजे', 'स्वयंवर', 'आमचे दोष आम्हांस कधी दिसू लागतील ?', 'सोवळ्याची मीमांसा', 'पांचजन्याचा हंगाम', 'ग्रामण्य प्रकरण', 'शहाण्यांचा मूर्खपणा' या निबंधांतून आगरकरांचे सारे व्यक्तित्व स्पष्ट दिसून येते.
ब्रिटिशकालात जे निबंध- ग्रंथकार झाले त्यांत लो. टिळक हे अग्रगण्य होत. ज्ञानोपासना, व्यासंग हा त्यांच्या निबंधाचा पहिला विशेष होय. वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, स्मृती, कालिदास, भवभूती ही संस्कृत सरस्वती तर त्यांच्या जिभेवर अखंड नाचत होतीच पण पाश्चात्य विद्येतील तत्त्वज्ञान व भौतिक शास्त्रे यांचा त्यांनी तसाच अभ्यास केला होता. प्लेटो, ॲरिस्टॉटल, कांट, शोपेनहार, बेंथाम, मिल, ग्रीन हे सर्व तत्त्ववेत्ते आणि डाल्टन, डार्विन, हेगेल हे शास्त्रज्ञ, यांच्या ग्रंथांचे त्यानी आलोडन केले होते. 'गीतारहस्य', 'मृगशीर्ष', 'आर्क्टिक होम' या त्यांच्या
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७७२