आले', 'रोमच्या सुताराची गोष्ट', या त्यांच्या गाजलेल्या कथा होत. अं. शं. अग्निहोत्री यांनी सुमारे ५०० कथा लिहिल्या आहेत. मध्यम वर्गाच्या सामाजिक जीवनाचे ते बहुधा चित्रण करतात. त्यांच्या कथांतील पात्रे व प्रसंग विविधता आश्चर्यजनक आहे.
जयवंत दळवी, वि. शं. पारगावकर, श्री. ज. जोशी, अच्युत बरवे, स्नेहलता दसनूरकर, इंद्रायणी सावकार, आनंद यादव, जी. ए. कुळकर्णी, शंकरराव खरात, मधु मंगेश कर्णिक, विजया राजाध्यक्ष, उद्धव शेळके, व. अ. कुंभोजकर यांची नावे या क्षेत्रात खुपच गाजली आहेत. यांतील बहुतेक लेखक १९४७ च्या पुढच्या काळातले आहेत.
यांतील अनेक लेखकांच्या कथा 'मनोरंजन' (संपादक- काशीनाथ रघुनाथ मित्र), रत्नाकर (संपादक- ना. सी. फडके, अ. स. गोखले), किर्लोस्कर, स्त्री (संपादक- शं. वा. किर्लोस्कर) या प्रसिद्ध मासिकांतून येत असत. या कथा व इतर साहित्य प्रसिद्ध करून या मासिकांनी फार मोलाची कामगिरी केली आहे.
विनोदी वाङ्मय ही स्वतंत्र वाड्मय शाखा आहे. आणि ती इतरांइतकीच महत्त्वाची आहे. जीवनातील विसंगती शोधून ती हास्यास्पद करून दाखविणे याला फार तीव्र बुद्धी लागते आणि मुख्य म्हणजे भौतिक जीवनाची निकोप अभिरुची लागते. प्राचीन काळात तिचा अभाव, हे त्या काळी मराठीत उत्तम विनोदी वाङ्मय नसण्याचे मुख्य कारण आहे. अर्वाचीन मराठी साहित्यात विनोदाची गंगोत्री निर्माण झाली ती श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्यापासून. 'सुदाम्याचे पोहे' हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्याचा विनोद, विनोदासाठी विनोद, या प्रकारचा नव्हता. विनादाच्या द्वारे अनिष्ट रूढींचे विध्वंसन, लोकभ्रमांचा निरास व धर्मभोळेपणाचे उच्चाटण करावे असा त्यांचा त्रिविध हेतू होता. मी (सुदामा), बंडूनाना व पांडूतात्या असे तीन मानसपुत्र निर्माण करून त्यांनी समाजातील व्यंगावर प्रहार केलं. 'शिमगा', 'गणेश चतुर्थी', 'श्रावणी', 'निर्जळी एकादशी' या त्यांच्या लेखांवरून याचा प्रत्यय येईल.
गडकरी- बाळकराम- हे कोल्हटकरांचे शिष्य 'ठकीच्या लग्नाची तयारी' या लेखात त्यांनी लग्न जमविण्याच्या पद्धतीवर खरपूस टीका केली आहे. तर 'कवींचा कारखाना' यात कसे तरी काव्य लिहिणारांचा तीव्र उपहास केला आहे. कोटीबाजपणा व अतिशयोक्ती ही त्यांची साधने होती. कोल्हटकराप्रमाणेच त्यानी तिंबूनाना, बाळक्या, ठकी अशी काल्पनिक पात्रे निर्माण केली आहेत.
चिं. वि. जोशी यांच क्षेत्रातले स्थान सर्वात मोठे आहे. डॉक्टर, वकील, संशोधक,