Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५५
मराठी ललित साहित्य
 

ही त्यांनी काढले होते. पण त्यांची कविता केशवसुतांहून खूपच निराळी आहे. बाह्य सजावटीकडे त्यांनी जास्त लक्ष दिले आहे. त्यांच्या प्रणयगीतांत निराशा ओतप्रोत भरली आहे. गोफ, फुले विचिली पण, प्रेम आणि मरण, घुबड या कविता त्या प्रकारच्या आहेत. गुलाबी कोडे, गोड निराशा, विरामचिन्हे, घुंगुरवाळा या कवितांतून त्यांची असामान्य कल्पकता दिसून येते. स्मशानातले गाणे, दसरा यांतून त्यांनी सामाजिक रूढींवर तीव्र हल्ला केलेला दिसतो.
 बालकवी हे निसर्गाचे कवी अशी त्यांची प्रसिद्धी आहे. अरुण, संध्यातारक, संध्यारजनी, निर्झर, फुलराणी ही त्यांची काव्ये यासाठीच प्रसिद्ध आहेत. सर्वत्र निसर्गावर मानवी भावनांचा त्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे या कवितांना शोभा आली आहे. फुलराणीमधील मुग्ध प्रणयाचा रंग हा अगदी बिनतोड असा आहे. काही कवितांत त्यांनी प्रेषितांचे उसने अवसान आणलेले दिसते. ते अगदी कृत्रिम आहे. समाजाचे, भोवतालच्या परिस्थितीचे कसलेही अवलोकन त्यांनी केलेले नव्हते. स्वतःचे एक विश्व निर्माण करून त्यातच ते रमून राहिले. त्यामुळे त्यांच्या काव्याला व्यापकता, विविधता आली नाही. ते शेवटपर्यंत बालच राहिले.
 'बी' कवी यांनी वृत्तरचना व बाह्यवेश या दृष्टीने केशवसुतांचे अनुकरण केले नसले तरी त्यांची पठडी तीच आहे. कवी आणि काव्य, रूढीविरुद्ध बंड, गूढ गुंजन, विचारप्राधान्य हे सर्व तसेच आहे. डंका, तीव्र जाणीव, चाफा या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत.
 या सर्व कवींत भास्करराव तांबे यांचे स्थान अगदी वेगळे आहे. सृष्टीत सर्वत्र सौंदर्य कोंदून भरले आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि ती त्यांच्या काव्यात पदोपदी प्रकट होते. त्यांच्या प्रणयकाव्यात निराशेचा सूर चुकूनसुद्धा येत नाही. मरण ही कल्पना त्यांना फार मोह घालते. इतकी की 'मरणातून खरोखर जग जगते', असे ते म्हणतात. 'कुणि कोडे माझे उकलिल का, घट भरे प्रवाही, घट तिचा रिकामा' या त्यांच्या काव्यातून त्यांचे प्रेमतत्त्वज्ञान व्यक्त होते. 'रुद्रास आवाहन' ही त्यांची कविता अगदी निराळी आहे. क्रांतीला प्रेरणा देणारी ही कविता आहे. पण अशी कविता त्यांनी फिरून लिहिली नाही.
 सावरकर आणि कवी गोविंद यांचा वर्ग निराळा आहे. त्यांची कविता ती खरी राष्ट्रीय कविता होय. सावरकरांच्या मित्रमेळाव्यात सामील झाल्यावर कवी गोविंद यांनी लिहिलेल्या कविता अत्यंत ओजस्वी झाल्या. 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?' ही त्यांची कविता त्या वेळी महाराष्ट्रात सर्वत्र दुमदुमत होती.
 सावरकरांची कविता सर्वच दृष्टींनी भव्य दिव्य अशी आहे. मूर्ती दुजी ती, सप्तर्षी, मरणोन्मुख शय्येवर या त्यांच्या कविता राष्ट्रभावनेने रसरसलेल्या आहेत. रानफुले हा त्यांच्या दीर्घ काव्यांचा संग्रह आहे. 'गोमंतक' हे त्यांचे संकल्पित महाकाव्य होते. 'सागरास', 'सान्त्वन' या त्यांच्या लहान कविता मराठीत अमर झाल्या आहेत.