'ज्ञानोदय' नावाचे मासिकही मिशनऱ्यांनी काढले होते. या सर्वात हिंदुधर्माची निंदा मनसोक्त केलेली असे आणि देवाच्या दहा आज्ञा, प्रेषितांची कृत्ये, शाब्बाथनिरूपण इ. ख्रिस्तीधर्मप्रकरणे विवरून सांगितलेली असत. मिसेस फारॉर या बाईंनी बाबाजीची बखर, राधानाथाची गोष्ट इ. गोष्टीही लिहिल्या.
एकंदर हिशेब पाहाता ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ख्रिश्चन धर्मपंथाची ६९ पुस्तके, हिंदु- धर्मावर टीका करणारी १५-२० पुस्तके, बोधप्रद गोष्टींची १५ पुस्तके व इतर विषयांवरची २५ पुस्तके त्या काळात लिहिली. याशिवाय वर सांगितल्याप्रमाणे कोश, व्याकरण व क्रमिक पुस्तके त्यांनी लिहिली. यावरून अर्वाचीन मराठी साहित्याचा प्रारंभ त्यांनी केला, हे म्हणणे सार्थ आहे असे दिसून येईल.
जुनी चाकोरी
यानंतर आपल्या लोकांनी ब्रिटिश काळात केलेल्या मराठी साहित्याचा विचार करावयाचा. तो करू लागताच एक विचित्र गोष्ट ध्यानात येते ती ही काव्य, कादंबरी, नाटक व कथा हे जे ललित साहित्य ते या प्रारंभीच्या काळात, म्हणजे अव्वल इंग्रजीत, जुनी पठडी सोडून गेलेच नाही. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, दादोबा पांडुरंग, जोतिबा फुले, भाऊ महाजन इ. पंडितांचा वर उल्लेख आलेला आहेच. ब्रिटिश राज्य स्थापन झाल्यावर १०/१५ वर्षांतच यांनी नव्या पाश्चात्य प्रेरणा आत्मसात केल्या आणि धर्म, समाजरचना, राजकारण, अर्थव्यवस्था या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर मूलगामी असे विचार सांगण्यास प्रारंभ केला. पण नवलाची गोष्ट ही की काही अपवाद वगळता, काव्य, कथा, कादंबरी यांना या नव्या प्रेरणांचा स्पर्शही झालेला आढळत नाही. हे सर्व ललित लेखक त्याच वातावरणात राहात होते. वरील पंडितांच्या बरोबर कार्यही करीत होते. तरी त्यांच्या लेखनात नव्या विचारांचा मागोवा दिसू नये ही अत्यंत आश्वर्याची व खेदाची गोष्ट आहे. गद्य निबंधवाङ्मय अशा रीतीने अत्यंत वेगाने पुढे चालले असताना, हरिभाऊ आपटे, अण्णासाहेब किर्लोस्कर, व केशवसुत यांच्या काळापर्यंत, मराठी ललित वाङ्मय जुन्या इंग्रजपूर्व पठडीतूनच चालत राहावे, हे खरोखर न उलगडणारे कोडे आहे.
(पुढे काव्य, कादंबरी, लघुकथा, विनोद व लघुनिबंध यांचे विवेचन केले आहे. नाट्यवाङ्मयाचा विचार कला विभागात केला आहे.)
जुनी कविता
असे हे जे अव्वल इंग्रजीतले ललितवाङ्मय त्याचे स्वरूप आता पाहू. त्यात प्रथम काव्याचा विचार करू.