यांचा. सर्व महाराष्ट्रभर वणवण हिंडून, संस्थानिक, सरदार, इतर प्रतिष्ठित लोक यांच्या घरी जाऊन त्यांनी शेकडो ऐतिहासिक कागद मिळविले व ते बावीस खंडांत प्रसिद्ध केले. त्या खंडांना प्रस्तावना लिहून त्यांनी त्या पत्रांतून दिसणाऱ्या इतिहासाचे विवेचनही केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला काही मूर्तरूप प्राप्त झाले आहे, त्याचे श्रेय वि. का. राजवाडे यांनाच बव्हंशी आहे.
खरे शास्त्री
खरे शास्त्री यांचा प्रयत्न मर्यादित क्षेत्रात, पण असाच महत्त्वाचा आहे. पटवर्धन दप्तरातील कागद मिळवून त्यांचे त्यांनी तेरा खंड प्रसिद्ध केले व राजवाड्यांसारख्या त्यांना चिकित्सक प्रस्तावनाही लिहिल्या. खरे शास्त्री यांचा मराठ्यांच्या इतिहासाचा व्यासंग अतिशय गाढ असा होता. तात्यासाहेब केळकर यांच्या 'इंग्रज आणि मराठे' या नामांकित ग्रंथाला त्यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती फारच मार्मिक अशी आहे. मराठ्यांच्या सर्व इतिहासाचे सारभूत तात्पर्य तीत आलेले आहे.
दप्तर
यानंतर पेशवे दप्तर (सरदेसाई, भाग ४६), पुरंदरे दप्तर, भाग १-२, होळकरी पत्रव्यवहार- भागवत, मराठेशाहीतील पत्रे- भालेराव, भारतवर्ष- पारसनीस, मराठी दप्तर रुमाल, १, २, ३- भावे, ग्वाल्हेरचा पत्रव्यवहार- पारसनीस, अशी मराठ्यांच्या इतिहासासंबंधी अनेक कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. बखरी, करीने, कैफियती या निराळ्याच. हे मराठीतले साहित्य झाले. शिवाय इंग्रजी, पोर्तुगीज, डच, फारशी, आरबी या भाषांत मराठ्यांच्या इतिहासाविषयी विपुल साहित्य उपलब्ध झालेले आहे. आणि सेन, यदुनाथ सरकार यांसारख्या परप्रांतीय इतिहासकारांनी त्याचा भरपूर उपयोग करून आपले इतिहास सजविलेले आहेत.
इतिहाससंशोधन क्षेत्रात म. म. द. वा. पोतदार यांचे नाव महशूर आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात प्रथम सभासद, नंतर चिटणीस व शेवटी कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. 'इंडियन हिस्टरी कॉंग्रेस' च्या अलाहाबाद अधिवेशनात ते विभागाध्यक्ष होते व १९४८ साली दिल्लीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 'इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्डस् कमिशन' मध्येही त्यांनी अनेक वर्षे कार्य केले आहे. त्यांनी मोठा संशोधन ग्रंथ लिहिला नाही. पण स्फुट लेख अनेक लिहिले. 'आदिलशाही आर्थिक फर्मान', 'तंजावर मोडी ताम्रपट', 'कित्येक शिवकालीन घराणी', 'शिवकालीन राजनीती', 'वडू येथील प्राचीन अवशेष', 'दाभाड्याचे मुजुमदार', 'जयपूर येथील जुनी महाराष्ट्रीय घराणी', 'राष्ट्रसंरक्षक रामचंद्र नीळकंठ,' असे त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत.
वा. सी. बेंद्रे हे मोठे पट्टीचे संशोधक आहेत. १९२८ साली त्यांचा 'साधन चिकित्सा'
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७४६