तत्त्वही सांगितले आहे. 'आपले देशाचे हित करावे हा मुख्य धर्म युरोपात समजतात' असे सांगून हाच धर्म आपण पाळावा असा उपदेश लोकहितवादींनी केला आहे.
नवी दृष्टी
यावरून पाहाता असे दिसते की बाळशास्त्री व लोकहितवादी यांनी समता, बंधुता, स्वातंत्र्य, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, इहवाद, भौतिकविद्या, बुद्धिप्रामाण्य इ. पाश्चात्य सुधारणेची सर्व तत्त्वे आपल्या लेखनातून सांगितलेली आहेत. मराठी राज्य संपून पंचवीस तीस वर्षे झाली नाहीत तोच ही नवी दृष्टी त्यांना प्राप्त झाली, हा मोठा चमत्कार वाटतो. मराठी राज्यात, निदान मुंबईच्या महाराष्ट्रीयांना ही दृष्टी इंग्रजांच्या सहवासाने १७५० नंतर यावयास वास्तविक काही हरकत नव्हती. तसे झाले असते तर येथे जपानप्रमाणे क्रांती होऊन हा देश संघटित व बलशाली झाला असता व त्याचे स्वातंत्र्य गेले नसते. पण तसे घडले नाही. त्यामुळे वीस पंचवीस वर्षात ती दृष्टी आली हेही भाग्यच, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दादाभाई
यानंतर दादाभाई, न्या. रानडे व त्यांचे सहकारी यांनी जी प्रत्यक्ष राजकीय चळवळ केली तिचा विचार करावयाचा आहे. दादाभाईंनी इंग्रज या देशाची लूट करीत आहेत, रक्तशोष करीत आहेत, हे दाखवून दिले, हे त्यांचे मुख्य कार्य. त्याचे विवेचन मागे केलेच आहे. खरे म्हणजे हेच त्यांचे राजकीय कार्य होय. इंग्रजांच्या आसुरी सत्तेची सम्यक कल्पना हिंदी लोकांना देणे, यापेक्षा जास्त मोठे राजकीय कार्य ते काय असणार ? पण त्याचे बाह्य स्वरूप आर्थिक होते, म्हणून ते आर्थिक सदरात घातले इतकेच. आता याशिवाय त्यांनी राजकीय क्षेत्रात आणखी काय केले ते पाहू.
बाँबे असोसिएशन
हिंदी लोकांना राज्यकारभारात अधिकाराच्या जागा मिळाव्या ही आरंभीची प्रमुख मागणी होती. १८३३ साली ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीला नवी सनद दिली, पण तीमधली आश्वासने पाळली नाहीत, हे वर सांगितलेच आहे. त्यासाठी व तशाच अन्य कारणांसाठी १८५२ साली मुंबईस बाँबे असोसिएशन या संस्थेची दादाभाईच्या नेतृत्वाने स्थापना झाली; आणि राज्यकारभारात हिंदी लोकांना समाविष्ट करावे आणि प्रांतिक कायदे मंडळात त्यांना जागा मिळाव्या अशा आशयाचा ठराव करून असोसिएशनने तो पार्लमेंटकडे पाठविला. अशा रीतीने लोकसत्ताक राजकारणाचा हिंदुस्थानात जन्म झाला.
पुढे दादाभाई इंग्लंडात गेले व तेथील पार्लमेंटात निवडून आले. त्या काळातला हा त्यांचा मोठा पराक्रम होय. जाती, धर्म, देश ही न बघता, केवळ गुणांवर मनुष्याची
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१५
राजकारण