धिक्कार केला होता त्याचा उघड उघड अंगीकार केला आणि जगव्यापकता वाऱ्यावर सोडून दिली. त्याबरोबर भारतीय कम्युनिस्टांनी सावध होऊन, राष्ट्रनिष्ठ होऊन रशियाशी संबंध तोडून टाकावयास हवे होते. पण तसे त्यांनी केले नाही व रशियातील 'इंटरनॅशनल', 'कॉमिटर्न', 'कॉमिनफॉर्म' या शब्दांना भुलून त्यांनी रशियाची गुलामगिरी पतकरली. हिटलर हा उघडपणे कम्युनिझमचा शत्रू होता. पण स्टॅलिनने त्यांच्याशी सख्य केले. तेव्हाही येथील कम्युनिस्टांचे डोळे उघडले नाहीत. पुढे स्टॅलिन हिटलरचा शत्रू झाला व इंग्रजांचा मित्र झाला. तेव्हा कम्युनिस्टांनीही पगडी फिरवली आणि १९४२ च्या लढ्याच्या वेळी काँग्रेसविरुद्ध ब्रिटिश साम्राज्यशाहीचा पक्ष त्यांनी घेतला. कामगारांचे हित, वर्गविग्रह, कम्युनिस्ट क्रांती, ही तत्त्वे त्यांच्यांत राहिलीच नाहीत. रशियाचे जे मत ते यांचे मत, असे होऊन भारतात निर्माण झालेली एक फार मोठी शक्ती वाया गेली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला तर नाहीच, पण कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीलाही तिचा काही उपयोग झाला नाही.
समाजवादी पक्ष
मार्क्सच्या प्रेरणेने भारतात निर्माण झालेला दुसरा पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष होय. काँग्रेसचे केवळ राष्ट्रवादी धोरण या पक्षाला अमान्य होते. शेतकरी व कामकरी यांची संघटना करून जमीनदार भांडवलदार वर्गाविरुद्ध लढा केला पाहिजे आणि तो, ब्रिटिशांशी स्वातंत्र्यलढा चालू असतानाच, केला पाहिजे असे या पक्षाचे मत होते. १९३० सालापासूनच जयप्रकाश नारायण, नरेन्द्र देव, अच्युत पटवर्धन, एस. एम. जोशी, पुरुषोत्तमदास त्रिकमदास, ना. ग. गोरे, साने गुरुजी इ. काँग्रेसमधील तरुणांना काँग्रेसचे जमीनदार भांडवलदारधार्जिणे धोरण नापसंत होऊ लागले. म्हणून त्यांनी १९३४ साली 'काँग्रेस समाजवादी पक्षा'ची स्थापना केली. पण स्वातंत्र्यलढा हे मुख्य उद्दिष्ट त्यांनी दृष्टिआड केले नाही. त्यामुळे काँग्रेसमधून फुटून निघावयाचे नाही, असे त्यांनी निश्चित ठरविले. १९४२ च्या काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्यात या पक्षाने फार मोठे कार्य केले. त्यामुळे त्याला व त्याच्या नेत्यांना फार मोठी प्रतिष्ठा लाभली व काँग्रेसचे भावी नेते, अशा दृष्टीने लोक त्यांच्याकडे पाहू लागले. याच वेळी तरुणांच्या संघटना उभारून त्यांना खेड्यांत पाठवून पाटबंधारे घालणे, रस्ते करणे, सहकारी संस्था उभारणे इ. कामे सुरू करून त्यांनी जनजागृतीचे काम सुरू केले. पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांशी यांचे मुळीच पटेना. म्हणून ते काँग्रेसमधून बाहेर पडले व त्यांनी समाजवादी पक्ष म्हणून वेगळा पक्ष स्थापन केला. पण दुर्दैव असे की पहिले तेज पुढे त्यांच्यात राहिले नाही. १९५२ च्या निवडणुकीत फारसे यश न मिळाल्यामुळे त्यांचे नेते नाउमेद झाले. अनेक नेते पक्षाला सोडून अन्य क्षेत्रात गेले. सर्व समाजवादी तरुणांना एकत्र करून पक्ष संघटित ठेवील अशी कुवत त्यातील कोणातही नव्हती. त्यामुळे या पक्षाची अगदी वाताहात झाली आणि तो नाममात्र शिल्लक राहिला.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७०८