Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६९४
 


दारिद्र्य-कारणे
 धर्म आणि समाजकारण या क्षेत्रांप्रमाणेच याही क्षेत्रात लोकहितवादी यांनी पुढील शंभर वर्षाला पुरतील असे विचार आपल्या शतपत्रांतून सांगितले आहेत. व्यापार, उद्योग, कारखाने, स्वदेशी, बहिष्कार, सर्व, सर्व विषय त्यांनी हाताळले असून त्या सर्व विषयांत द्रष्ट्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
 बंगालमधील राजाराम मोहन राय व त्यांचे सहकारी यांनी धर्म व समाजरचना या बाबतींत अत्यंत पुरोगामी विचार सांगितले आहेत. पण ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाचे त्यांना मुळीच आकलन झाले नव्हते. त्यांच्या कारखान्यामुळे वस्तू स्वस्त मिळू लागल्या व मजुरांना जास्त मजुरी मिळू लागली, याबद्दल ते इंग्रजांना धन्यवाद देत असत. ब्रिटिशांच्या कारभाराची केवढी भुलावण तेव्हा पडली होती, हे यावरून दिसून येईल. लोकहितवादी ब्रिटिश राज्याचे चाहते होते, तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेचे मर्म त्यांनी बरोबर जाणले होते.
 हिंदू लोक दरिद्री का झाले याची कारणे सांगताना ते म्हणतात, 'तूर्त दरिद्र मोडण्यास उपाय असा की ब्राह्मण लोकांनी आपल्या मूर्खपणाच्या समजुती सोडून कारकून व भट हे दोनच रोजगार आम्ही करू, असे म्हणू नये. तर काच, कापड, सुरी, कात्री, लाकडी सामान, घड्याळे इ. पुष्कळ इंग्रज इकडे खपवितात, ही सर्व आपले लोकांनी करावयास शिकावे व येथे जो माल खपणार नाही तो दुसऱ्या देशात नेऊन खपवावा. इंग्रजांचे देशचे सामान बंद करावे, किंबहुना आपले सामान त्यांस द्यावे, परंतु त्यांचे आपण घेऊ नये. यास्तव आपणांस जाडी, मोठी धोतरे नेसावयास लागली तर काय चिंता आहे? परंतु आपले देशाचे रक्षण करावे. असे झाले म्हणजे बहुत रोजगार होतील' (पत्र क्र. ६०). स्वदेशी व बहिष्कार या चळवळी १९०५ नंतर सुरू झाल्या. त्या आधी पन्नास वर्षे लोकहितवादींनी तसा उपदेश लोकांना केला होता.

व्यापार बुडाला
 'हिंदू लोकांचा व्यापार' या पत्रात हाच विषय त्यांनी जास्त स्पष्टपणे मांडला आहे. 'सांप्रत हिंदू लोक भिकारी होत चालले आहेत. याचे कारण मला असे दिसते की या लोकांचा व्यापार अगदी बुडाला. इंग्रज व दुसरे देशचे लोक फार शहाणे होऊन या लोकांस सर्व जिनसा पुरवितात. आणि हे मुकाट्याने स्वस्ताईमुळे खरेदी करतात. म्हणून आपल्या लोकांनी कट करावा की दुसऱ्या मुलखाचा जिन्नस घ्यावयाचा नाही. आपल्या देशात पिकेल तेवढाच माल घ्यावा. आपले लोक कापडे जाडी काढतात. परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करतात त्याच घ्याव्या. अजून दाणे (धान्य) परदेशातून येऊ लागले नाहीत. बाकी सर्व कपडे, छत्री, घड्याळ, गाडी, बुके, सर्व