समप्रतिष्ठा द्यावयाची आणि तरीही दोघांनीही जुळते घेऊन कुटुंबसंस्था टिकवावयाची हे फार अवघड आहे. इंग्लंड-अमेरिकेत इतके दिवस लोकसत्ता टिकविण्यात यश आले होते, पण कुटुंबसंस्था टिकविण्याला तेथले स्त्री-पुरुषही अयशस्वी झाले आहेत. दर तीन कुटुंबामागे एक घटस्फोट अशी तेथे अवस्था झाली आहे आणि आता हे प्रमाण इतके वाढत चालले आहे की लग्नसंस्था आणि कुटुम्बसंस्था मोडूनच टाकावी असा विचारप्रवाह तेथे सुरू झाला आहे. पण यामुळे तेथे मुले वाऱ्यावर सोडल्यासारखी झाली आहेत आणि त्यांच्यांत व्यसने, गुन्हेगारी, अत्याचार, स्वैराचार यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. म्हणजे स्त्रीच्या व्यक्तित्वाला अवसर द्यावा तर समाजातल्या सर्वांच्याच व्यक्तित्वाचा नाश होत आहे असा याचा अर्थ आहे. जगातील सर्व समाजात विवेक, समंजसपणा, दूरदृष्टी, आत्मसंयमन, जुळते घेण्याची वृत्ती यांचा अभाव आहे, अशा स्थितीत लोकशाही टिकणार नाही आणि कुटुंबसंस्थाही टिकणार नाही. भारतीय स्त्रीपुरुषांनी याचा गंभीरपणे विचार करून या गुणांची जोपासना केली पाहिजे आणि आपली लोकसत्ता व कुटुंबसंस्था टिकवून धरण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. ती टिकली तरच समाज टिकेल आणि सामाजिक क्रांतीच्या आपल्या कल्पना साकार होतील.
सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धर्मक्रांतीप्रमाणेच सामाजिक क्रांतीचाही तितक्याच आवेशाने पुरस्कार केला आहे. तेव्हा त्यांचीच अवतरणे देऊन या विवेचनाचा समारोप करणे उचित होईल. सहभोजनाचा पुरस्कार करताना ते म्हणतात, 'शतवार सांगितले तरी फिरून एकदा सांगतो की हिंदू राष्ट्राच्या अभ्युत्थानास्तव राजकारण नि समाजकारण ही दोन्ही साधने अत्यावश्यक आहेत. राजकारण ही एका हातातील चढती तलवार तर समाजकारण ही दुसऱ्या हातातील बचावती ढाल! यांपैकी कोणतेही एक दुसऱ्यावाचून पंगू आहे' (जात्युच्छेदक निबंध, पृ. ३२४). भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचारही याच दृष्टिकोणातून ते मांडतात. 'जे हिंदुराष्ट्राचे स्वातंत्र्य आपणांस मिळवावयाचे, ते जातिभेदजर्जर झालेल्या या आपल्या राष्ट्रपुरुषास जरी मिळविता आले, तरी रोगाचे निर्मूलन झाले नाही तोपर्यंत, ते पुन्हा गमावण्याचा पाया भरत जाणार आहे' (उक्त ग्रंथ, पृ. १०).
'जर आम्ही हिंदू या जन्मजात जातिभेदाचा समूळ उच्छेद करू तरच तरू व राष्ट्र म्हणून, धर्म म्हणून यापुढे जगू शकू. जोवर या जातिभेदास आम्ही आमच्याच इच्छेने आमच्या राष्ट्राच्या कंठास नख लावू देत आहो, तोवर आम्हांस मारण्याचे काम शत्रूस करावयास नकोच. आम्ही आपण होऊनच मरत आहो. मद्रासमध्ये इस्लाम व इसाई दोहो हातांनी आमचे संख्याबळ लुटीत आहेत यात काय आश्चर्य ! जी दु:स्थिती मद्रासची तीच सर्वत्र.'
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७१७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९१
समाज परिवर्तन