वर्णसंकर अवश्य
जातिभेदावर अशी प्रखर टीका करून आगरकरांनी वर्णसंकराचा हिरीरीने पुरस्कार केला आहे. ते म्हणतात, 'त्यांच्या (सनातनी शास्त्री- पंडितांच्या) धर्मग्लानीच्या बऱ्याच भागास आम्ही धर्मग्लानी न मानता धर्मोत्कर्ष समजतो. मूर्तिपूजा नाहीशी होणे, वर्णसंकर होऊन पाहिजे त्याला पाहिजे त्याशी अन्नोदकव्यवहार वा लग्न करण्याची सदर परवानगी असणे, पाहिजे त्याने पाहिजे त्या शास्त्राचा किंवा धर्मग्रंथाचा अभ्यास करणे वगैरे गोष्टी प्रचारात आल्यास कोणत्याही प्रकारची धर्मग्लानी होणार आहे, असे आम्हांस वाटत नाही. त्या जुन्या प्रकारच्या आचारांनी हिताहून अहितच अधिक होत आहे, असा आमचा समज आहे.' अस्पृश्यतेविषयी आगरकरांनी फारसे लिहिलेले नाही. पण त्याविषयी त्यांची मते अशीच क्रांतिकारक होती. ग्रामण्य प्रकरणाविषयी लिहिताना त्यांनी म्हटले आहे की 'ब्राह्मणेतराच्या हातचा चहा पिण्यास आम्हांस दोष वाटत नाही. इतकेच नव्हे, तर नीच मानलेल्या महारांची स्थिती सुधारून त्यांची व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची एक पंगत झालेली जर आम्हांस पाहता येती तर आम्ही स्वतःस मोठे कृतार्थ मानले असते.'
स्त्री-पुरुष समता
सर्व सामाजिक सुधारणांमध्ये स्त्री-सुधारणेला आगरकरांनी अग्रस्थान दिले आहे. कारण त्यांच्या मते समाजस्थिती ही गृहस्थितीवर अवलंबून असते आणि ही गृहस्थिती स्त्रीचे कुटुंबातील स्थान, तिची प्रतिष्ठा, तिचे अधिकार, तिचे स्वातंत्र्य यांवर अवलंबून असते, असे सांगून प्रौढविवाह, पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण या सर्व सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला आहे. प्रौढविवाहाचा विचार मांडताना त्यांनी स्वयंवराचे किंवा आजच्या भाषेत प्रेमविवाहाचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते तो व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. ज्यांना दुसऱ्या कोणी पसंत केलेल्या बायका चालतात आणि ज्यांना रत्युपभोगासाठी दुसऱ्यांनी कोंडून घालावे लागते, त्यांच्या हातून कसलेही राष्ट्रकार्य होण्याचा संभव नाही, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. स्त्री-शिक्षणाविषयी लिहिताना स्त्री- पुरुषांना एकच शिक्षण, आणि तेही एकत्र दिले पाहिजे, असे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे. यात स्त्री-जीवनाचा उत्कर्ष तर आहेच, पण शिवाय प्रसंग आला तर शिक्षण हे स्त्रीला चरितार्थसाधन म्हणून उपयुक्त ठरण्याचा संभव आहे, हाही विचार त्या काळी त्यांनी सांगितला आहे.
स्त्रीसुधारणाविषयक आगरकांनी जे लिहिले आहे ते अत्यंत आवेशाने, त्वेषाने, आणि तीव्र भाषेत लिहिले असून त्यामागे पांडित्य, तत्त्वचिकित्सा व तळमळ हीही तितकीच आहे. जातिभेद, अस्पृश्यता इ. सर्वच सुधारणांच्या बाबतीत त्यांची लेखणी अशीच जहाल आहे आणि विद्वत्तेने भूषविलेली आहे. आगरकरांना या क्षेत्रात
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८१
समाज परिवर्तन