Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७३
धर्मक्रांती
 


माकड-भाकड
 अपरिवर्तनीयता हा आपल्या धर्मातला दुसरा महादोष. 'माकड महासंमेलन व भाकड महासंमेलन' या लेखात या दोषाचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले आहे. परिस्थिती- प्रमाणे आपले आचार आपण पालटले पाहिजेत, हे माकडांच्या संमेलनात मंजूर झाले. पण काशीच्या शास्त्रीपंडितांनी 'परिस्थिती, पालट हे लक्षात घेऊन धर्मात परिवर्तन घडविणे हे पाखंड होय,' असा ठराव केला. म्हणूनच त्याला सावरकरांनी भाकड महासंमेलन म्हटले आहे.
 शुद्धी आणि संघटन यांना सावरकरांच्या हिंदुराष्ट्रवादात फार महत्त्वाचे स्थान होते. शुद्धिबंदीमुळे केवढा अनर्थ झाला आहे याचे त्यांनी अनेक ठिकाणी विवरण केले आहे. बाटलेल्या व परत स्वधर्मात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंना, हिंदुराज्यातसुद्धा, मुसलमान म्हणूनच राहावे लागे. हा हिंदुधर्म !' हे त्यांचे उद्गार अगदी भेदक असे आहेत.

सप्तशृंखला
 सावरकरांचा सप्तशृंखलांचा सिद्धांत प्रसिद्धच आहे. वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी या त्या सात शृंखला- बेड्या होत आणि दुर्दैव असे की त्या आपणच आपल्या पायात ठोकून घेतल्या आहेत. याचा अर्थ असा की हिंदूंच्या अधःपाताला त्यांचे तेच जबाबदार आहेत आणि या बेड्या आपण होऊन तोडून टाकीत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, आणि मिळाले तरी ते टिकणार नाही, असे सावरकरांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
 बाळशास्त्री जांभेकरांपासून सावरकरांपर्यंत महाराष्ट्रात धर्माच्या क्षेत्रात कोणी कोणती तत्त्वे सांगितली व काय कार्य केले त्याचे विवेचन येथवर केले. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होईल की या धर्मक्रांतीमुळे जो नवा जोम व सामर्थ्य भारतात निर्माण झाले, त्यामुळेच या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. या थोर नेत्यांनी याबरोबरच सामाजिक क्रांतीचे तत्त्वज्ञानही सांगितले व काही प्रमाणात तीही घडवून आणली. तिचे महत्त्व धर्मक्रांतीइतकेच आहे. वर सांगितलेच आहे की ही दोन्ही अंगे आणि तशीच राजकारण व अर्थकारण हीही अंगे अविभाज्य आहेत. विवेचनाच्या सोयीसाठी त्यांचा पृथकपणे विचार करावयाचा इतकेच. येथून पुढे क्रमाने तो करावयाचाच आहे. येथे धर्मक्रांतीचा समारोप करताना मनात येणारा एक विचार सांगतो. म. म. काणे, म. म. पाठक, तर्कतीर्थ जोशी, दिवेकर शास्त्री यांच्या योग्यतेचे काही पंडित मराठेशाहीच्या काळात किंवा त्या अगोदरच्या कालखंडात झाले असते तर महाराष्ट्राचे आणि भारताचेही स्वातंत्र्य गेले नसते आणि हिंदूंची अवनती झाली नसती. या शास्त्री पंडितांनी केलेल्या धर्मक्रांतीचे महत्त्व यावरून ध्यानात येईल.


 ४३