हे ठरविण्यास निश्चित असा कसलाही आधार नाही. पंडितांनी दिलेली मते म्हणजे केवळ अनुमाने आहेत आणि तीही व्यक्तिनिष्ठ काल्पनिक अनुमाने! म्हणून ती स्वीकारणे युक्त नाही. पण या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा विचार ध्यानात ठेवला पाहिजे. महाराष्ट्रीयांचा मूळ वंश वा जाती कोणती हे ठरविण्याचा अट्टाहास करण्याचे कारण, राजवाड्यांसारख्या काही पंडितांच्या मनात तरी निदान असे आहे की त्यांच्या मते संस्कृती ही वंशजातिवर्ण यांवर असते. आणि महाराष्ट्राची संस्कृती श्रेष्ठ आहे हे ठरविण्यास हे लोक श्रेष्ठवंशीय वा वर्णीय आहेत हे ठरविणे अवश्य आहे, असे त्यांना वाटते. हा भ्रम आपण आपल्या मनातून प्रथम काढून टाकला पाहिजे. या विषयाचे सविस्तर विवेचन पुढे समाजरचनाप्रकरणी येईलच. पण विपषयपूर्तीसाठी त्याचा सारार्थ सांगतो. पहिली गोष्ट अशी की आर्य हा शब्द वंशवाचक नाही, हे आता निश्चित सिद्ध झाले आहे. दुसरे असे की इ. सनाच्या दहाव्या शतकापर्यंत भारतात आणि महाराष्ट्रातही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्यांत अनुलोम व प्रतिलोम विवाह विपुल होत असत. अनुलोम विवाहाला तर धर्मशास्त्राचीच मान्यता होती. त्यामुळे अमका वर्ण, अमकी जात येथे शुद्ध रक्ताची राहिली आहे, असा वृथाभिमान धरून, तिच्यामुळे संस्कृतीचा उत्कर्ष झाला किंवा दुसऱ्या संकरज जातीमुळे अपकर्ष झाला या म्हणण्याला काही अर्थ नाही. द्रविड, नाग, शक, हूण यांच्याशी आर्य म्हणविणाऱ्या लोकांचा उत्तरेत व दक्षिणेतही संकर होत होता याला विपुल ऐतिहासिक प्रमाणे उपलब्ध झालेली आहेत. शक, यवन, कुशाण, हूण, आभीर यांनी शतकानुशतक येथे धुमाकूळ घातला होता व दीर्घकाळ राज्येही चालविली होती. आणि रणकंदनेही केली होती. अशा स्थितीत वंशशुद्धी कितपत टिकली असेल हे सहज ध्यानात येईल. तेव्हा वर्ण व कर्तृत्व यांचा अविभाज्य संबंध आहे असे ज्यांचे मत आहे त्यांनीसुद्धा हे सत्य ध्यानात घेऊन राजवाड्यांसारखी विधाने न करणे हेच श्लाघ्य होय. या बाबतीत डॉ. इरावतीबाई कर्वे यांनी पुष्कळ संशोधन केले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जातिउपजातींची रक्ते तपासली आहेत. आणि त्या सर्व माहितीच्या आधारे 'मराठी लोकांची संस्कृती' या आपल्या ग्रंथात, वंशावर संस्कृतीचा उत्कर्षापकर्ष मुळीच अवलंबून नाही, असा निर्णय दिला आहे. 'संस्कृतीची परंपरा ही शरीर- परंपरेपेक्षा अगदी निराळी आहे, हे ध्यानात ठेविले तर सामाजिक प्रश्न सोडविण्यास लागणारी बुद्धीची शुद्धता तरी निर्माण होईल' असे त्यांनी म्हटले आहे (पृ. ७४ ). महाराष्ट्र - संस्कृतीच्या अभ्यासात मूळ वंशाच्या विचाराला महत्त्व नाही, असे मी जे वर म्हटले आहे ते याच अर्थाने. पण हे मत ज्यांना मान्य नाही त्यांनीही, निश्चित प्रमाणांच्या अभावी, कोणतीही ठाम विधाने करण्याचा मोह टाळणे हेच श्रेयस्कर ठरेल.
महाराष्ट्र हे नाव कसे पडले याविषयी अशीच अनिश्चितता आहे. त्याही बाबतीत ढोबळ विचार असा दिसतो की राष्ट्रिक, रट्ट, रठ्ठ हे लोक गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पंडुराष्ट्र, विदर्भ, अपरान्त, कुंतल अशा वसाहती करून येथे दीर्घकाळ रहात होते. ते एका
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
४२