धर्माचा अर्थ
धर्म हे संस्कृतीचे सर्वात श्रेष्ठ अंग होय. येथे धर्म या शब्दाचा प्राचीन ऋषिमुनी- प्रणीत धर्म असा अर्थ अभिप्रेत आहे. ईश्वरभक्ती, मानवतेचे प्रेम, सत्य, न्याय, दया, क्षमा, शांती, त्याग, परोपकार, समाजसेवा, सत्त्व, स्वाभिमान, प्रवृत्तिवाद, वैभवाच्या, अभ्युदयाच्या, स्वराज्यसाम्राज्याच्या आकांक्षा, निर्लोभ वृत्ती, निर्मळ, विशुद्ध जीवन, औदार्य हा सगळा धर्माचा अर्थ आहे. श्रीकृष्ण, व्यास, संत, समर्थ, शिवछपती यांनी हाच अर्थ मानला होता, हे मागे अनेक प्रकरणांतून सांगितलेलेच आहे. त्याचे विवेचनही तेथे केलेले आहे. असा हा जो परम श्रेष्ठ धर्म, त्याचा हिंदुस्थानातून मराठ्यांच्या काळाच्या अखेरीस संपूर्ण लोप झाला होता. हेमाद्रीपासून या काळापर्यंत जे शास्त्रीपंडित झाले, त्यांचा धर्म म्हणजे कर्मकांड, व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, उपास- तापास, सोवळे ओवळे, नाना प्रकारचे अर्थहीन आचार हा होता. खरा धर्म म्हणजे काय हे जाणण्याची पात्रताच त्यांच्या ठायी नव्हती.
पण मराठेशाहीचा अंत होऊन पाश्चात्य विद्येचा प्रसार येथे होताच धर्माचा खरा अर्थ येथल्या नेत्यांना अत्यंत अल्पावधीत कळू लागला आणि प्रथम बंगालमध्ये आणि मग महाराष्ट्रात धर्मसुधारणेची चळवळ सुरू झाली.
१८४८ साली लोकहितवादी यांनी 'प्रभाकर' पत्रात जी 'शतपत्रे' लिहिली, त्यांत धर्मसुधारणेची, खऱ्या धर्माची सर्व तत्त्वे सांगितली आहेत. पण त्याच्याही आधी बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग यांनी धर्मसुधारणेची चळवळ सुरू केली होती. तिचा परामर्श घेऊन मग लोकहितवादींचा विचार करू.