Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६५२
 

करता आला नसता. इतकेच नव्हे, तर वरील नियतकालिकांतून एकही लेख लिहिता आला नसता.
 जी गोष्ट बाळशास्त्री यांची तीच भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग इ. लेखकांची होती. किंबहुना कोणत्याही सुधारकाची होती. शब्दप्रामाण्याचे बंधन पाळून त्यांना काहीही करता आले नसते. जोतिबा फुले यांचे कार्य तर विशेष अभिनंदनीय आहे. त्यांनी या शब्दप्रामाण्याचा क्षणभरही मुलाहिजा न बाळगता, ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वावर टीका केली, इतर वर्णांच्या समानतेचा पुरस्कार केला, आणि स्त्रियांना व अस्पृश्यांना शिक्षण देण्यासाठी शाळा काढल्या. त्यांचा आयुष्यातला प्रत्येक श्वासोच्छ्वास म्हणजे शब्दप्रामाण्यावर आघातच होता.

कार्यकारण नाही
 जुन्या शास्त्रांतील बंधनांमध्ये आणखी एक घातक गोष्ट होती. त्यांत केवळ आज्ञा केलेल्या असत. त्यांच्या मागे तर्काचे, कार्यकारणाचे, सयुक्तिकतेचे कसलेही विवेचन केलेले नसे. मानवाला यामुळे त्यांनी सर्वस्वी गुलाम करून टाकले होते. त्याच्या मानवत्वाला कसली म्हणून प्रतिष्ठाच त्यांनी ठेवली नव्हती. पशूला जसे दाव्याने बांधून जखडून टाकतात, तसे त्यांनी मानवाला बांधून टाकले होते. न्या. मू. रानडे यांनी म्हटले आहे की अशा बंधनांमुळे आपला समाज हा बालच राहिला. त्याला प्रौढपणा आलाच नाही. मानवाला काही व्यक्तित्व असते, त्याला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती असते, तिला काही अवसर दिला पाहिजे, याचा कसलाही विचार या जुन्या ग्रंथकारांनी केलेला नाही. जातींच्या आचारधर्मात तेच आहे. त्याच्या मागे विचारसरणी अशी काही नाही आणि व्यक्तीचा विचार तर मुळीच नाही. मागली सगळी शास्त्रबंधने, रूढीबंधने आणि जातिबंधने ही व्यक्तीला मुळी विचारातच घेत नाहीत. असले हे शब्दप्रामाण्य समाजाचा अधःपात न घडवील तरच नवल.

मानसिक स्वातंत्र्य
 विष्णुशास्त्री यांनी इंग्रजांवर कडक टीका केली आहे. तरी त्यांच्या राज्यातील व्यक्तिस्वातंत्र्याचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. निबंधमालेच्या पहिल्या निबंधातच त्यांनी म्हटले आहे की 'वरच्या लिहिण्याने हल्लीच्या राज्याचा आम्ही द्वेष करतो किंवा त्यांनी आपल्या देशावर जे अपरिमित उपकार केले आहेत किंवा अजूनही करीत आहेत ते आम्ही जाणीत नाही असे नाही. आम्हांस तर वाटते की असे विचार करण्याची शक्ती आमचे अंगी आणून त्याचा उल्लेख उघडपणे करण्याची जी मोकळीक आमचे सरकार आम्हांस देत आहे त्यापरते औदार्य कोणतेही नाही.' 'आमच्या देशाची स्थिती' या शेवटच्या निबंधात त्यांनी हेच विचार व्यक्त केले आहेत. 'त्याचप्रमाणे मानसिक स्वातंत्र्य हाही या काळात झालेला सर्वात मोठा लाभ होय. मानसिक