सुधारणा व्हावयाची तर त्यांना मुख्य म्हणजे विद्या हव्या. पण त्या पुराणातल्या विद्या नव्हत, संस्कृतातल्या नव्हत. तर ज्या विद्या त्या काळी प्रगट झाल्या होत्या, ज्या वास्तविक जग व व्यवहार यांच्या दर्शक होत्या त्या विद्या होत.
महात्मा फुले
जोतिबा फुले हे स्वतः फार शिकलेले नव्हते. पण पाश्चात्य ग्रंथकारांच्या ग्रंथांचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना भौतिक विद्येची महती उत्तम समजली होती. म्हणून तर त्यांनी स्त्रियांसाठी व अस्पृश्यांसाठीही शाळा उघडल्या.
यानंतर भारतात विद्यापीठांची स्थापना झाली आणि इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, गणित, इतर भाषा, भाषाशास्त्र, यांचा रीतसर अभ्यास सुरू झाला. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर, विश्वनाथ नारायण मंडलीक, दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग इ. विद्वान पुढे आले आणि त्यांनी आपल्या सर्व सुधारणांची या नव्या विद्येच्या पायावरच उभारणी केली. याच सुमारास जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन, कोलंबस इ. थोर पाश्चात्य पुरुषांची चरित्रे मराठीत लोक लिहू लागले. वर्तमानपत्रे निघू लागली आणि भौतिक ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होऊ लागला.
ज्ञानाची देणगी
असे असूनही विष्णुशास्त्री, टिळक यांच्या काळापर्यंत पाश्चात्य ज्ञानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे महत्त्व लोकांना वाटत असे. 'वक्तृत्व' या निबंधात विष्णुशास्त्री म्हणतात, 'इंग्रज सरकारचा या देशावर सर्वात मोठा उपकार हा होय की ज्ञानाची अमोलिक देणगी त्याने या देशास दिली व अद्याप देत आहे. चाळीस वर्षांपूर्वी मेकॉलेने जी नवी पद्धत सुरू केली तिच्यामुळे ही विद्या प्रसार पावून त्यामुळे देशाची स्थिती आजवर एकंदर बदलून गेली आहे, असे म्हटले असता चालेल.' 'निबंधमाला' हे नवे मासिक पुस्तक काढताना त्यांनी म्हटले आहे की, 'इंग्लंड वगैरे देशात सामान्य माणसास जे ज्ञान असते ते येथील सुशिक्षितासही नसते.' आणखीही अनेक ठिकाणी, जेथे संधी सापडेल तेथे विष्णुशास्त्री यांनी पाश्चात्य विद्येचा असाच गौरव केला आहे.
पाश्चात्य शास्त्रे
लो. टिळकांचे असेच धोरण होते. पाश्चात्य विद्येशिवाय तरणोपाय नाही, याविषयी त्यांचे दुमत नव्हते. १९०७ साली बेळगावला, 'सरकारी शिक्षण व राष्ट्रीय शिक्षण ' या विषयावर बोलताना ते म्हणाले, 'तरुण पिढीने विद्वान, बुद्धिमान, निश्चयी व शरीरसामर्थ्याने युक्त व्हावे, एवढीच आमची इच्छा नाही, तर आमच्या तरुणांनी पाश्चात्य शास्त्रात पारंगत व्हावे, अशी आमची प्रबल इच्छा आहे. ही पाश्चात्य शास्त्रे
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४९
नव्या प्रेरणा