Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४७
नव्या प्रेरणा
 

बाणेल आणि तेथून ते हळूहळू सैन्यात पसरेल. तसे होऊन आपले साम्राज्य जाण्याची वेळ आली तरी त्याला त्यांची तयारी होती. कारण मग या देशात शांतता नांदेल, सर्व हिंदुस्थानचा कारभार यशस्वी करून दाखविणारे पुरुष येथे निर्माण होतील, ते देशात शिस्त व कायदा आणतील आणि मग आपला व्यापार तरी हिंदुस्थानात उत्तम चालेल. साम्राज्यापेक्षा त्यांना व्यापाराचीच काळजी जास्त होती. त्यामुळे प्रथम जनता व नंतर सैन्य यांच्यांत राष्ट्रीय वृत्ती निर्माण व्हावी व मग त्यांनी स्वातंत्र्य मिळवावे, याला त्यांची हरकत नव्हती. पण आहे या स्थितीत लोक व लष्कर अर्ध रानटी अवस्थेत असताना जर लष्कर उलटले व आपल्याला येथून जावे लागले तर मात्र साम्राज्यही जाईल व व्यापारही जाईल असा धोका होता आणि त्याला मात्र त्यांची तयारी नव्हती.
 पुढल्या इतिहासावरून आपण हे जाणतोच की ब्रिटिशांची आशा व अटकळ अगदी खरी ठरली. प्रथम राष्ट्रभावना हिंदी जनतेत पसरली व तेथून ती सैन्यात शिरली. टिळक, गांधी यांनी पहिले कार्य केले व सुभाषचंद्रांनी दुसरे कार्य केले आणि सैन्य आपल्यावर उलटले आहे हे ध्यानात येताच, इंग्लंडचे मुख्य प्रधान मेजर ॲटली यांनी, इंग्लंडातून सैन्य आणून हिंदुस्थानात राज्य करणे अशक्य आहे, हे जाणून भारताला स्वातंत्र्य देऊन टाकले.
 हे कसे घडत गेले तेच आता अपाणास पाहावयाचे आहे. मराठ्यांना जे साधले नाही, इ. सनाच्या अकराव्या शतकापासून आलेली अचेतन स्थिती नष्ट करण्यात कोणालाच यश आले नाही, ते यश अगदी अल्पावधीत, साधारण शंभर वर्षांत मिळवून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेण्याइतके सामर्थ्य भारताला कसे प्राप्त झाले, त्याचाच आता विचार करावयाचा आहे.

भौतिक विद्या
 भारतीयांनी सर्वांगीण क्रांती घडवून हे जे सामर्थ्य प्राप्त करून घेतले त्याचे पहिले साधन म्हणजे भौतिक विद्या, ऐहिक जगाचे ज्ञान हे होय. राजा राममोहन राय यांची याविषयीची मते प्रसिद्धच आहेत. येथे संस्कृत विद्येच्याच शाळा काढाव्या असा इंग्रजांचा विचार होता. पण बेकन, डेकार्ट यांच्या ज्या ज्ञानामुळे युरोपीय समाज सुधारला ते ज्ञान, ती भौतिक विद्या आम्हांला द्या असा आग्रह त्यांनी धरिला. प्रारंभी जे विवेचन केले आहे त्यावरून इंग्रज मुत्सद्द्यांचाही त्याला विरोध नव्हता, हे ध्यानात येईल.

बाळशास्त्री
 महाराष्ट्रात असा पहिला प्रयत्न बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ साली दर्पण हे साप्ताहिक काढून केला. पहिल्या अंकात त्यांनी लिहिले आहे की 'वृत्तपत्रामुळेच युरोपास सज्ञानदशा प्राप्त होऊन त्याची प्रगती झाली. ज्या ज्या देशात अशा लेखांचा