चरित्रे, इंग्लंडचा, फ्रान्सचा इतिहास, पुरातत्त्वसंशोधन, भारताचा प्राचीन इतिहास या व असल्या विषयांना, संत, पंडित, आख्यानकवी, चरित्रकार, आणि शाहीर सुद्धा, यांपैकी कोणी स्पर्शही केला नव्हता. याचा अर्थ काय ?
याचे कारण उघड आहे. ते सर्व या विषयांना वमनप्राय मानीत होते. वामन, श्रीधर, मोरोपंत यांच्या भोवतीच मराठ्यांचा इतिहास घडत होता. तरी त्याविषयी त्यांनी काहीच कसे लिहिले नाही, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. या विषयात त्यांना रस नव्हता, ते याविषयी सर्वस्वी उदासीन होते, म्हणून त्यांनी त्याविषयी लिहिले नाही, हे त्याचे उत्तर आहे.
बुद्धीला आवाहन
दुसरी गोष्ट अशी की ऐहिक विषयांवर निबंध, प्रबंध किंवा ग्रंथ लिहावयाचा म्हणजे त्यात बुद्धीला आवाहन करावे लागते. अध्यात्मात असे काही नाही. संतांनी सर्वसामान्य जनतेला अध्यात्माचे गहन सिद्धान्त समजावून दिले. बुद्धीला आवाहन करून पटवून देण्याचा तेथे प्रश्नच नव्हता. तसे करावयाचे तर स्वतःच्या व इतर देशातल्या इतिहासातील प्रमाणे, भोवतालच्या परिस्थितीचे विवेचन, घटनांची कार्य- कारणमीमांसा हे सर्व आले. पण प्राचीन मराठी साहित्याला याची मुळीच गरज नव्हती. कारण अध्यात्मातील आत्मा, परमात्मा, मोक्ष, कर्म इ. सर्व सिद्धान्त हे बुद्धीच्या पलीकडचे आहेत. ते फक्त उपमा-दृष्टान्तांनी समजावून द्यावयाचे असतात. प्राचीन मराठी साहित्यिकांनी तेच केले. पंडितांना याच्या जोडीला काव्य सौंदर्य निर्माण करावयाचे होते. तेथेही बुद्धीला आवाहन करण्याचा प्रश्न नव्हता. प्राचीन संस्कृत साहित्याचे उत्तम मराठीत रूपांतर त्यांना करावयाचे होते. ते त्यांनी केले. महाभारतात काही ठिकाणी राजधर्म, व्यापार, अर्थमाहात्म्य, इ. विषयांवर बौद्धिक विवेचन आहे. पण पंडितकवींनी तो विषय अजिबात गाळून टाकलेला आहे. कारण तो त्यांना त्याज्यच होता. भगवन्नामसंकीर्तन करावे, संसारातून तरून जाण्यासाठी गावे हा त्यांचा, लेखनामागचा हेतू होता. यामुळे त्यांनी ऐहिक विषयांवर ग्रंथ लिहिले नाहीत. पण मराठ्यांना ऐहिकप्रपंच करावयाचा होता, साम्राज्यविस्तार करावयाचा होता. त्यासाठी निबंध, ग्रंथ निर्माण करणे अवश्य होते. व्याख्यानांची आवश्यकता होती. पेशव्यांना व्याख्यानांचे महत्त्व समजले नव्हते, असे राजवाडे यांनी म्हटले आहे. ही फारच मोठी उणीव होती. तोफाबंदुकांपेक्षाही राष्ट्रभावना, देशाभिमान, पूर्वजांचा इतिहास, शत्रूचा इतिहास, त्याचे बलाबल, या विषयांवरील ग्रंथांचे महत्त्व जास्त आहे, हे पेशव्यांनी जाणले नाही. मराठेशाहीचा अंत होण्याच्या अनेक कारणांपैकी हे प्रधान कारण आहे.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३९
प्रबोधनाच्या अभावी