Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६३४
 


शेतीचे दारिद्र्य
 गावचा मुख्य धंदा शेतीचा असे. पाटील, कुळकर्णी, इनामदार यांना जमिनी वतनदारीने मिळालेल्या असत. शास्त्री-पंडित, देवस्थाने यांनाही जमिनीची वतने असत. आणि राहिलेल्या कोणाच्या तरी मालकीच्या असत.
 अशा या अर्थव्यवस्थेवर शेकडो वर्षे समाज गुजराण करीत राहिला होता. ही सर्व व्यवस्था अत्यंत निकृष्ट व दरिद्री होती, हे उघडच आहे. सर्व शेती बहुधा कोरडवाहू असल्यामुळे दोन वेळची बेगमी करणे, हेच मुळी शेतकऱ्याला अवघड होते. आणि अशा या शेतीवर त्याचा आणि राष्ट्राचा प्रपंच चालावयाचा ! मराठेशाहीत पूर्वीप्रमाणेच हा चालत राहिलाही असता. पण मराठ्यांच्या चित्तात अखिल भारतात साम्राज्य स्थापण्याची, हिंदुपदपातशाही स्थापण्याची, महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. त्यांची ही आकांक्षा या अर्थव्यवस्थेतून भागणे अशक्य होते.

व्यापार हा पाया
 इंग्रज बाहेर पडले ते व्यापारासाठी. तात्यासाहेब केळकर यांनी आपल्या पुस्तकात हिशेब दिला आहे. तीस हजार रुपयांच्या लवंगा येथून नेल्या की इंग्लंडात त्याची तीन लक्ष साठ हजार रुपये किंमत येत असे. एका जहाजामागे ७-८ लक्ष रु. फायदा सहज होई. टॉमस रो याने आपल्या अहवालात लिहिले आहे की 'मोगलांची सधन बंदरे आम्ही भिकेस लावली, त्यांचा व्यापार बुडविला' इंग्रजांनी साम्राज्य स्थापण्याचा विचार केला तेव्हा, त्यांच्यामागे धनाचे असे सामर्थ्य होते. पुढे १७६० च्या सुमारास तेथे कारखानदारी मुरू झाली आणि तीतूनही इंग्लंडला अमाप पैसा मिळू लागला. तो व्यापार आणि ती कारखानदारी यांच्या बळावर इंग्रजांना हिंदुस्थानात साम्राज्याच्या उलाढाली करण्यास पैसा उपलब्ध होऊ शकला. उलट मराठ्यांनी आकांक्षा साम्राज्याची ठेवली, पण अर्थव्यवस्था मात्र जुनीच राहू दिली. तीत सुधारणा करण्याचे त्यांच्या मनातही आले नाही. त्यामुळे कर्ज, दारिद्र्य, दैन्य, दिवाळखोरी हीच येथल्या अर्थव्यवस्थेची कायमची लक्षणे होऊन बसली. यावर साम्राज्य कसे उभे राहाणार ?

आर्थिक पाया नाही
 शेती हा हिंदुस्थानातील लोकांचा मुख्य व्यवसाय. 'पेशवेकालीन महाराष्ट्र' या आपल्या ग्रंथात वा. कृ. भावे यांनी त्याची माहिती दिली आहे. एकंदर दोन पृष्ठे ! सर्व अर्थव्यवस्थेच्या पायाची इतकीच प्रतिष्ठा ! पेशव्यांनी काही ठिकाणी पडलेले, फुटलेले बंधारे दुरुस्त करण्यास मंजुरी दिली; कोठे माळरानावर नवीन शेती करण्यास साह्य केले, एवढीच ही माहिती आहे. पण धरणे बांधली, कालवे काढले, असे कोठेही नाही. हा उद्योग वास्तविक भारतात वेदकालापासून चालू होता. महाभारतात नारदाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला आहे की 'तुझ्या राज्यात शेती पावसाच्या पाण्यावर