Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
३८
 

भिन्न असल्या तरी इ. पूर्व तिसऱ्या शतकापासून त्यांच्यावर संस्कृत व प्राकृत यांचे वर्चस्व बसू लागले होते. अशा स्थितीत एका भाषेतील शब्द, रूपे, म्हणी इ. अन्य भाषेत सापडतात एवढ्यावरून फार मोठी अनुमाने काढणे हे युक्त नाही.

मराठे लोक कोण ?
 पहिल्या प्रकरणात मराठी भाषेची पूर्वपीठिका आपण पाहिली. नंतर या प्रकरणात 'महाराष्ट्र' या अभिधानाच्या इतिहासाचा व त्याच्या विस्ताराचा शोध घेतला. आता महाराष्ट्रीय म्हणजेच मराठे हे लोक कोण आहेत, ते कोणत्या वंशाचे होते, ते येथे केव्हा आले व या भूमीला महाराष्ट्र हे अभिधान मिळाले ते कोणावरून, हे पाहावयाचे आहे. ते पाहून झाले की महाराष्ट्राच्या पृथगात्मतेचा निश्चय पूर्ण झाला असे होईल.
 या बाबतीत आजपर्यंत निरनिराळ्या पंडितांनी जी मते मांडली आहेत ती येथे एकत्र मांडण्यापलीकडे काही करता येण्याजोगे नाही. कारण प्रत्यक्ष शास्त्रीय व ऐतिहासिक अशी प्रमाणे, असे आधार, या बाबतीत फार थोडे आहेत - जवळजवळ नाहीतच. बहुतेकांनी शब्दांच्या व्युत्पत्तीचा आधार घेतला आहे. तो आधार किती फसवा असतो ते पंडितांनी एकमेकांवर ज्या टीका केल्या आहेत त्यांवरून सहज दिसून येईल. व्युत्पत्ती- खेरीज इतर आधार म्हणजे प्राचीन ग्रंथांत दक्षिणेतल्या जमातींच्या नावाचे जे उल्लेख येतात व त्यांची जी वर्णने सापडतात, ते होत. पण त्यांतील पुष्कळशी वर्णने काल्पनिक असतात. आपापल्या वंशाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी चंद्रसूर्यास्तापर्यंत आपली परंपरा नेऊन भिडवावयाची अशी पूर्वी लोकांना फार हौस असे. त्याचप्रमाणे इतरांना हीन ठरविण्यासाठी त्यांना संकरज ठरविण्याचा उद्योगही चालू असे. मनूने व इतर धर्मशास्त्रकारांनी संकरज जातींच्या याद्याच्या याद्या दिल्या आहेत. आता या धर्मशास्त्रज्ञांनी संकराचे हे गुणदोष कसे ठरविले, त्यांना यात कितपत माहिती होती, त्यांना यातले काय कळत होते, हे मोठेच प्रश्न आहेत शिवाय यांतल्या प्रत्येक ग्रंथात पुढील लोकांनी हवी तशी भर घातली आहे. त्यामुळे त्यातून मागल्या काळच्या लोकांविषयी काही विश्वसनीय माहिती मिळेल ही आशा करण्यात अर्थ नाही. आणि माझ्या मते त्याला महत्त्वही नाही. महाराष्ट्रातले आजचे लोक जुन्या काळी प्रथम कोठून आले, ते कोणत्या वंशाचे होते, आर्य होते की अनार्य होते, नाग होते की द्रविड होते, ब्राह्मण होते की महार होते याला ऐतिहासिक जिज्ञासा, कुतूहल यापलीकडे काही महत्त्व नाही. त्यांनी पराक्रम कोणते केले, कर्तृत्व कसे प्रगट केले, मन, बुद्धी, प्रतिभा यांचे कोणते सामर्थ्य त्यांच्या ठायी दिसत होते याला सांस्कृतिक दृष्ट्या खरे महत्त्व आहे. ऐतिहासिक घटनांच्या आधारे ते जितक्या निश्चयाने ठरविता येईल तितके ठरविणे हे आपले उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राची पृथगात्मता ठरविण्यासाठी भाषेच्या संशोधनाला व नामाभिधानाच्या इतिहासाला जसे महत्त्व आहे तसे येथल्या लोकांच्या मूळस्थानाच्या व त्यांच्या मूलवंशाच्या शोधाला नाही. आहे ते त्यांच्या कर्तृत्वाला आहे. म्हणजेच त्यांच्या संस्कृ-