Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६२०
 


अनंत फंदी
 अनंत फंदी हाही राम जोश्याप्रमाणेच प्रारंभी तमासगीर आणि पुढे कीर्तनकार झाला. होनाजी बाळाने याला 'कवनाचा सागर' म्हटले आहे. पण त्याची कविता फार थोडी उपलब्ध आहे. त्याने जे उपदेशपर फटके रचले, त्यामुळे त्याला मोठी कीर्ती मिळाली. या कवनांतून त्याची तडफ आणि मार्मिकता दिसून येते.
 'खर्ड्याची लढाई', 'शेवटचे बाजीराव', 'यशवंतराव होळकर', 'फत्तेसिंग गायकवाड' हे त्याचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. 'उलटा जमाना' ही त्याची दुष्काळावर रचलेली लावणी आहे. 'धन्य तुझे लावण्य', 'चंद्रावळ' या त्याच्या शृंगारी लावण्या आहेत.
 शेवटचा मोठा शाहीर म्हणजे सगनभाऊ (१७७८- १८४०) हा होय. हा मुसलमान असून त्याचा शिकलगारीचा धंदा होता. पानपत, खडकी, दुसरा बाजीराव यांवर याने पोवाडे रचले आहेत.
 या शाहिरी वाङ्मयाचे परीक्षण केले असता, अलंकार, कल्पना, रस, शब्दचित्रे, निसर्गवर्णने, उपहास, विनोद, निवेदनशैली इ. काव्याचे सर्व गुण त्यात ओतप्रोत भरलेले दिसतात. आणि शिवाय शाहिरांनी स्वकालीन ऐहिक जीवन वर्णिले, हा त्याचा आगळा वेगळा विशेष आहे. म्हणूनच मराठी साहित्यात त्यांना मोठे मानाचे स्थान. मिळाले आहे.

द्रष्टेकवी?
 पण हे सर्व सांगितल्यावर क्रांतदर्शी कवी, द्रष्टे कवी अशा दृष्टीने त्यांचे परीक्षण करू लागताच, त्यांच्यात फार उणिवा दिसू लागतात. मराठ्यांच्या इतिहासाचे विवेचन मागे आलेच आहे. त्यांपैकी जे प्रसंग त्यांनी निवडले त्यांची काही मीमांसा यांनी काव्यात केली आहे काय ? दुही, फितुरी, स्वार्थ, राष्ट्राभिमानाचा व कोणत्याही निष्ठेचा अभाव या कारणांनी आपला पराभव झाला, याची, यांपैकी कोणाला जाणीव तरी दिसते काय ? मुळीच नाही. असे विवेचन करण्याचे सामर्थ्यच त्याच्या ठायी नव्हते.
 हे पोवाडे केव्हा कोणी रचले हे पाहण्यातही मर्म आहे. एकंदर पोवाडे ३०० उपलब्ध आहेत. पैकी शिवाजी ते शाहू ७, पेशवे काल १५० आणि बाकीचे मराठेशाहीच्या अंतानंतरचे आहेत. हा काळ आणि ही संख्याच त्यांच्या कविप्रतिभेवर विदारक प्रकाश टाकतात. स्वातंत्र्ययुद्धप्रसंगी, जालीम कवने रचून, गिरिकंदरात फिरून, या कवींनी, औरंगजेबाशी निःस्वार्थीपणे, वतनलोभ न धरता लढावे, अशी स्फूर्ती दिली काय ? स्वकाल हा त्यांचा विषय होता. पण या काळावर एकही पोवाडा नाही. हिंदवी स्वराज्य, महाराष्ट्रराज्य, गनिमी कावा, आरमारी युद्ध, इंग्रजांची, पोर्तुगिजांची आक्रमक राजनीती, महाराष्ट्र धर्म, धर्म आणि स्वराज्य, अशा काही