हे चरित्र आहे. त्यांचे शिष्य मेघराज, कामराज आणि सूरीजन यांनी अनुक्रमे 'यशोधरचरित्र', 'सुदर्शनचरित्र' व 'परमहंसकथा' असे ग्रंथ मराठीत रचले. ब्रह्मजिनदासाचा एक शिष्य ब्रह्मगुणदास हाच पुढे गुणकीर्ती आचार्य म्हणून प्रसिद्ध झाला. 'पद्मपुराण' हे जैनांचे रामायण त्याने रचले आहे. याशिवाय 'धर्मामृत', 'रुक्मिणीहरण', 'नेमिनाथ पाळणा' इ. अनेक ग्रंथ याने लिहिले आहेत. अभ्यासक या गुणकीर्तीला जैन मराठी साहित्यात आद्य स्थान देतात. चरित्र, भाष्य, टीका, गीत इ. सर्व प्रकारचे वाङ्मय याने लिहिले आहे.
मेघराजाचे 'यशोधरचरित्र' हे एक चांगले काव्य आहे. यशोधर व त्याची राणी अमृता यांची ही कथा आहे. यात शृंगार आणि वैराग्य यांचे सुंदर वर्णन केले आहे. याशिवाय 'पार्श्वनाथभवांतर', 'कृष्णगीत', 'गुजरी मऱ्हाठी गीत' अशी विविध रचना त्याने केली आहे. याचा गुरुबंधू पंडित सूरीजन याने 'परमहंसकथा' हा आध्यात्मिक रूपकात्मक ग्रंथ रचला आहे. प्रमाणबद्धता, नाट्य यांनी हा ग्रंथ संपन्न आहे.
१६५० च्या सुमारास दामा पंडित याने 'जंबुस्वामी-चरित्र' व 'दानशील तपभावना' असे दोन ग्रंथ रचले. जंबुस्वामी हे महावीरांनंतरचे तिसरे आचार्य. त्यांचे हे काव्यमय चरित्र फार महत्त्वाचे मानले जाते. 'दानशील तपभावना' हा ओवीबद्ध ग्रंथ आहे व त्यात या गुणांची महती संवादरूपाने वर्णिली आहे. सतराव्या शतकाच्या अखेरीस लातूर येथील भट्टारक महीचंद्र याने 'आदिनाथपुराण' या महाकाव्याची निर्मिती केली. आद्य तीर्थंकर ऋषभदेव यांचे हे चरित्र आहे. महीचंद्र याचे एक शिष्य देवेंद्रकीर्ती यांनी 'कालिकापुराण' हा ग्रंथ रचला. कष्टकरी जनतेची कालिका ही देवता आहे. तिचे हे पुराण आहे. कासार व बोगार समाजात याचे श्रद्धेने वाचक केले जाते.
जिनसागर हा जैन मराठी कवी अठराव्या शतकात होऊन गेला. 'जीवंधरपुराण' ही त्याची कथा शृंगार व वीररसाने ओथंबलेली आहे. जिनसागराने याशिवाय व्रतकथा, आरत्या, स्तोत्रे अशीही रचना केली आहे. याच शतकात जनार्दन याने 'श्रेणिकचरित्र' लिहिले. हा पुराणकाव्याचा आदर्श मानला जातो. या काव्यात त्याचा मराठीचा अभिमान प्रगट झाला आहे.
महतीसागर हा कवी एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी होऊन गेला. बारामती, फलटण या भागात त्याचे वास्तव्य असे. 'महती- काव्य-कुंज' या नावाने त्याचे काव्य प्रसिद्ध आहे. याच काळात १८१३ साली कवी रत्नकीर्ती याने 'उपदेशरत्नमाला' हा ग्रंथ लिहिला. त्यात सर्व जैन धर्माचे सार ग्रंथकर्त्याने आणले आहे.
या वर्णनावरून जैन मराठी साहित्याचे महत्त्व ध्यानात येईल. पुराण, चरित्र, आख्यान, धर्मकथा, खंडकाव्य, स्तोत्र, आरत्या, पदे, इ. सर्व प्रकारचे आणि विपुल वाङ्मय जैन मराठीत आहे. त्याचा एक विशेष म्हणजे त्यात कथानायक देव किंवा ऋषी नसून राजे, व्यापारी, अथवा शूद्रही असतात. त्यात चातुर्वर्ण्य संस्थेला महत्त्व नाही, यज्ञयागाला महत्त्व नाही, तर अहिंसादी गुणांचे वर्णन येते.
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१५
साहित्य आणि कला