Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६१०
 

मराठीतला हा सर्वश्रेष्ठ कवी होय. वि. ल. भावे यांनी रघुनाथ पंडितांचा खूप गौरव केला आहे. पण त्याचे काव्य करामतीचे, मेहनतीचे फल आहे, असे ते म्हणतात. मन वेडावून टाकण्याचे, नवे अनुभवविश्व पुढे उभे करण्याचे सामर्थ्य त्याच्या कवितेत, त्यांच्या मते नाही. एरवी मागे वर्णिलेले सर्व काव्यगुण त्याच्या या काव्यात आढळतात, हे त्यांनाही मान्य आहे.

सामराज
 निरंजन माधव आणि सामराज हे दोन कवी काहीसे प्रसिद्ध आहेत. निरंजन माधव हा थोरले बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांच्या पदरी होता. 'संप्रदाय परिमळ' हा याचा ग्रंथ प्रसिद्ध असून, त्याने आपली गुरुपरंपरा आपल्या स्त्रीस सांगितली आहे. 'मंत्ररामचरित,' 'निर्वोष्ठ राघवचरित,' 'चिद्बोध रामायण', 'रामकर्णामृत' अशी रामकथेवर याने बरीच रचना केली आहे. हा सर्व देशभर हिंडत असे. आणि ज्या ज्या देवतांचे तो दर्शन घेई त्यांवर स्तोत्रे रचीत असे. क्षेत्रामधील उपाध्ये, वडवे, गयावळ यांच्या नीतिहीन लोभी वृत्तीवर याने आपल्या कवनात फार कडक टीका केली आहे. सामराज या कवीचे 'रुक्मिणीहरण' हे एकच काव्य प्रसिद्ध आहे. पण त्यामुळे त्याला फार मोठी कीर्ती मिळालेली आहे. याचे एकंदर ८ सर्ग असून ११०० श्लोक आहेत. रुक्मिणीला तिच्या आईने सासरी कसे वागावं याचा उपदेश केला आहे. तो त्या काळच्या मुलींच्या दृष्टीने उत्तम आहे, असे टीकाकार म्हणतात. (पण रुक्मिणी ही राजकन्या होती व महाराणी व्हावयाची होती. त्या दृष्टीने हा उपदेश हास्यास्पद वाटतो). एकंदर रुक्मिणीहरण काव्याविषयी लिहिताना डॉ. वाटवे म्हणतात, येथे प्राचीन मराठी पंडिती काव्य खऱ्या अर्थाने साकार झाले आहे.

श्रीधर
 आख्यानकवींत श्रीधर कवीला फार महत्त्वाचे स्थान आहे. आधीच्या कवींनी स्फुट रचना पुष्कळ केल्या. मुक्तेश्वराने सर्व महाभारत रचण्यास प्रारंभ केला. पण पाचच पर्वे त्याच्या हातून झाली. या तुलनेने पाहता श्रीधराचे कार्य फार मोठे आहे. 'हरिविजय', 'रामविजय', 'पांडवप्रताप', 'जैमिनी अश्वमेध ', इ. मोठे ग्रंथ याने पूर्ण करून टाकले. कवी मोरोपंत याने अशीच मोठी रचना केली आहे. पण ती सर्व आर्यावृत्तात व संस्कृतप्रचुर भाषेत केल्यामुळे बहुजनसमाजाला दुर्बोध झाली. आख्यान कवींपैकी सर्व पंडित कवींची हीच वृत्ती आहे. अक्षरगणवृत्तांची त्यांना हौस फार. त्यामुळे व संस्कृतप्रचुतेरमुळे ते समाजापासून दूर गेले. श्रीधर कवीने आपली ही सर्व रचना ओवीवृत्तात व साध्या सोप्या नित्याच्या सुबोध भाषेत केली आहे. त्यामुळे खेड्या- पाड्यांतून घरोघर हरिविजय, रामविजय हे त्यांचे ग्रंथ अजूनही आवडीने वाचले जातात. रामकृष्णाच्या कथा सर्वजनांच्या मुखी करून टाकण्याचे मोठे श्रेय श्रीधराला आहे.