Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६००
 

पाठवून, त्यास फौज घेऊन नागपुरास येण्याचे निमंत्रण दिले. या बातम्या रेसिडेंट जेंकिन्स यास कळत होत्या. त्याने लगेच अप्पासाहेबास कैद करून पदच्युत केले. पण कैदेतून निसटून जाऊन त्याने पुष्कळ दिवस दंगा चालविला होता. जोधपूरच्या राजाने त्यास साह्यही केले. पण अंती फलनिष्पत्ती काहीच झाली नाही आणि अशा वनवासातच आप्पासाहेबाचा अंत झाला. तो नागपुराहून जाताच रघुजीची स्त्री दुर्गाबाई हिच्या मांडीवर दत्तक देऊन तेथला सर्व कारभार इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. अशा रीतीने या दुसऱ्या सरदारीची वाट लागली. त्यांच्या कोणाच्या मनात खरोखरच मराठेशाहीची चिंता असती, तर मध्यंतरी पुष्कळ वेळ होता. पण तशी लायकी कोणातच नव्हती. सीताबर्डीच्या लढाईची वार्ता सर्वत्र पसरताच इंग्रज सेनापती कर्नल गहन नर्मदेवर होता, तो धावत नागपुरास आला. उमरावतीहून मेजर पिटमन आला. जाफराबादेहून डोव्हटन आला. पण आप्पासाहेबाने निमंत्रणे कर-करूनही त्याच्या मदतीस कोणी आले नाही ! इंग्रज हा एक समाज होता आणि मराठे हे सर्व एकाकी होते. ते म्हणजे एक समुदाय होता.

इंदोर - होळकर
 यशवंतराव होळकराच्या मृत्यूनंतर त्याची रक्षा तुळसाबाई हिने आपल्या सवतीचा मुलगा मल्हारराव याची पदावर स्थापना करून कारभार चालविला. अमीरखान हा त्या वेळी लष्कराचा प्रमुख असून त्याच्याच शब्दाने कारभार चालत असे. गफूरखान, रामदीन, जालीम सिंग, कोटेकर हे इतर सरदार होते आणि धर्माकुवर, बाळाराम शेट व तात्या जोग हे कारभारी होते. या वेळी बाजीरावाशी संधान बांधून इंग्रजांवर उठण्याचा या होळकरी सरदारांचा विचार पक्का झाला होता. तात्या जोग याने त्याविरुद्ध सल्ला दिला, म्हणून त्याला तुळसाबाईने कैद केले. तुळसाबाई ही दुर्वर्तनी आणि अतिशय क्रूर होती. तिने १८११ मध्ये धर्माकुवरचा आणि १८१५ साली वाळाराम शेटचा खून करविला. हे दोघेही यशवंतरावाचे हाताखाली तयार होऊन चांगले कर्तबगार झाले होते. १८१७ च्या जूनमध्ये बाजीरावाचा इंग्रजांशी नवीन तह झाला आणि त्यानंतर त्याने इंग्रजांवर उठाव करण्याचे ठरविले व तसे होळकरांकडे गुप्तपणे कळवून, त्यास दक्षिणेत पाचारिले. या वेळी इंग्रजांनी पेंढाऱ्यावर मोहीम चालविली होती. त्यातील सीतू यास होळकराच्या गफूरखानादी सरदारांनी आपल्यात सामील करून घेतले आणि पुण्याहून उठाव झाला आहे, तर आपण पेशव्याला मिळालेच पाहिजे, असे ठरवून त्यांनी आपल्या फौजा बाहेर काढल्या. या वेळी मालकम या इंग्रज सरदाराने तुळसाबाईकडे वकील पाठवून, शिद्यांप्रमाणे तुम्ही आमच्याशी तह करा असे बोलणे चालविले व पेंढाऱ्यांस तुम्ही आश्रय देता कामा नये असे बजावले. या वेळी तुळसाबाईची खात्री झाली की इंग्रजांचा आश्रय केल्याखेरीज आपला निभाव लागणार नाही. म्हणून तिने बोलणे चालू ठेवले. पण लष्करी प्रमुख