Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५९८
 

चालू होते आणि एक दुसऱ्याचा काटा काढण्यास सदैव टपलेला असे. तोंडी भाषा मात्र इंग्रजांचा काटा काढण्याची होती. गायकवाड, भोसले, होळकर आणि शिंदे हे मराठा सरदार आणि स्वतः बाजीराव पेशवा हे मराठेशाहीचे आधारस्तंभ ! त्यांचे या दहाबारा वर्षांतले उद्योग पाहून मन उद्वेगून जाते. इंग्रजांना हाकलून देऊन स्वतंत्र होण्याची तोंडी भाषा आणि उद्योग मात्र पावलोपावली आत्मघाताचा ! असे हे या काळातले मराठेशाहीचे चित्र आहे.

दुबळे वारस
 गोविंदराव गायकवाड हा गुजराथचा सेनाखासखेल. तो १८०० साली मृत्यू पावला. इतर सरदारांप्रमाणे त्याला औरस व अनौरस मुलगे पुष्कळ होते. सरदेसायांच्या मते यामुळेच मराठशाहीचा घात झाला. पण सर्व संतती औरस असती तरी काही निराळे झाले असते असे काही नाही. गोविंदरावाचा वारस आनंदराव हा दुबळा व निःसत्त्व असा होता. या वेळी नियतीने मोठी करामतच केली. नागपूरकर रघूजी भोसले याचा मुलगा परसोजी हा असाच दुबळा, नेभळा व शून्य होता. यशवंतराव होळकरांचा वारस अगदी अल्पवयी. दौलतराव शिंदे याच्या कर्तृत्वाचा उजेड आपण पाहिलाच आहे; आणि शेवटी दुसरा बाजीराव ! पाचही घराण्यांतील वारस हे याप्रमाणे शून्य व नादान होते. मराठेशाहीचा अंत घडवून आणणे त्यांना काय अवघड होते !

बडोदा-गुजरात
 आनंदराव गायकवाड कारभार करू लागताच गोविंदरावाचे अनौरस पुत्र कान्होजी आणि मल्हारराव यांनी बंडावे सुरू केले. या वेळी बडोद्यास अरबांचे प्राबल्य फार माजले होते. या काळाच्या आधी जवळ जवळ वीस वर्षे प्रत्येक सरदाराचे जवळ अरब, पठाण, पुरभय्ये यांच्या फौजा बऱ्याच प्रमाणात असत. शरीररक्षक तर प्रत्येकाचे अरबच असत. मराठ्यांवर त्यांचा तसा विश्वासच नव्हता. खुद्द नाना फडणिसाचे शरीररक्षक अरब होते व त्याच्या वाड्याचे पहारेकरीही अरबच होते. गायकवाडीत याच्या दसपटीने हे झाले होते. त्यामुळे आनंदराव गायकवाडाला अरबांना हाकून लावण्यासाठी इंग्रजांची मदत घ्यावी लागली. इंग्रज यासाठी तयारच होते. निमंत्रणाप्रमाणे मुंबईहून वॉकर नावाचा सेनापती दोन हजार फौज घेऊन आला व त्याने अरब, कान्होजी इ. सर्वांच्या बंडखोरीचा बंदोबस्त करून आनंदरावाचा जम बसवून दिला आणि खर्चाच्या मोबदल्यात सुरत परगणा ताब्यात घेतला ! या वेळी (१८०२) आनंदराव गायकवाडने स्वदस्तूरचे पत्र लिहून दिले की 'मेजर वॉकर यांचा हुकुम यापुढे सर्वांनी मानावा. आम्ही स्वतः जरी त्यांच्या विरुद्ध काही लिहिले, तरी ते कोणी मानू नये, इतर कोणी काही केल्यास इंग्रजांनी त्याचा बंदोबस्त करावा,' असा हा सर्वग्रासी अधिकार इंग्रजांना मिळाला. आणि तो गायकवाडाने आपल्या सहीनेच