Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५९६
 

दासीपुत्र. त्यातील एकाने उत्तरेस व दुसऱ्याने दक्षिणेत लूटमार, जाळपोळ सुरू केली. त्या वेळी बाजीरावाने बापू गोखले यास पाठवून विठोबा होळकरास पकडून आणले व त्याला हत्तीच्या पायी दिले. यामुळे यशवंतराव संतापून गेला आणि पुण्यावर चालून आला. त्यामुळे बावरून बाजीराव इंग्रजांकडे पळाला आणि ३१-१२-१८०२ रोजी त्याने वसई येथे इंग्रजांशी तह केला. त्या दिवशी पेशवाई संपली, तहात तैनाजी फौजेचे कलम होतेच. बाजीरावाला पेशवाईवर बसविले पाहिजे, हे कलम अर्थातच मुख्य होते. त्याप्रमार्गे आर्थर वेलस्ली- नेपोलियनचा पराभव करणारा ड्यूक ऑफ वेलिंग्टन तो हाच याने १८०३ च्या मे महिन्यात त्याला पुण्यास आणून शनिवार वाड्यात स्थानापन्न केले.

दौलतरावाचे पत्र
 वर सांगितलेच आहे की बाजीरावाचे हे कृत्य त्याच्या सरदारांना मुळीच मान्य नव्हते. आर्थर वेलस्ली याने त्यांना सांगितले की बाजीराव तुमचा धनी. तेव्हा त्याने ज्या तहावर सही केली तो तुम्ही मान्य केलाच पाहिजे. पण तरीही शिंदे, भोसले, होळकर यांना ते पटले नाही आणि त्यांनी युद्धाची तयारी केली. या वेळी हे तिघेही सरदार एक झाले असते तर, इंग्रजांचा त्यांनी वडगावप्रमाणे निश्चित पराभव केला असता. पणे तसे घडले नाही. यशवंतराव होळकराने, शिंदे-भोसले यांस पत्रे लिहून, त्रिवर्ग एक झाल्यास इंग्रज भारी नाही, असे आवर्जून सांगितले. वरकरणी ते दोघे अनुकूल झाले. पण त्यांचा एकमेकांवर मुळीच विश्वास नव्हता. दौलतरावाने यावेळी बाजीरावास पत्र लिहिले की 'तूर्त होळकराचे म्हणण्यास रुकार देऊन त्यास खूष ठेवावे. इंग्रजांचे युद्ध आटोपल्यावर आपण यशवंतरावाचा चांगला समाचार घेऊ.' हे पत्र वाटेत राघोबाचा दत्तक पुत्र अमृतराव, बाजीरावाचा थोरला भाऊ, याने पकडले आणि ते जनरल वेलस्ली याजजवळ दिले. त्याने ते लगेच होळकरांकडे धाडले. ते पाहून यशवंतराव सर्द झाला आणि शिंद्यांकडे येण्यास निघाला असूनही, तसाच परत गेला. आणि पुढे शिंदे व भोसले यांचा पराभव होत असताना स्वस्थ बसून पाहात राहिला.

शिंदे-भोसले
 प्रारंभी शिंदे व भोसले एक झाले होत. त्यांच्यातही वाद होतेच. गनिमी काव्याने लढावे, असे रघूजी भोसल्याला वाटत होते, तर कंपूंनी ठासून उभे युद्ध करावे, असे दौलतराव शिंद्यांचे मत होते. त्यामुळे बहुनायकी निर्माण झाली. तरी इतके खरे की असईच्या लढाईत त्यांच्या फौजा एकत्र होत्या. तरीही या अंतर्गत बेबनावामुळे, आणि मुख्य म्हणजे इंग्रजांनी दुसऱ्या सरदारास नरम केले तर चांगलेच झाले, असे सगळ्याच सरदारांना मनातून वाटत असल्यामुळे, असईला शिंदे- भोसल्यांचा पराभव झाला (२५-९-१८०३). तरीही त्यांनी दम सोडला नव्हता. म्हणून इंग्रजांनी