Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५९४
 

संपूर्ण वाटोळे करील, अशी त्याला भीती होती. तेव्हा सवाई माधवरावांची बायको यशोदाबाई हिच्या मांडीवर कोणी दत्तक देऊन, त्याला पेशवा करावा असा त्याचा विचार होता. पण दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर यांना हे मान्य नव्हते. बाळाजी विश्वनाथाचा वंश हयात असताना, दुसऱ्या कोणास पेशवाई देणे युक्त नाही, असे त्यांस वाटत होते. आनुवंशाचे तत्त्व लोकांच्या किती हाडीमासी खिळले होते. हे यावरून ध्यानात येईल. छत्रपतींच्या नव्हे, तर त्याचा प्रधान पेशवा याच्या बाबतीतही लायक अशा सर्वस्वी नव्या माणसाला ते पद द्यावे, असे त्यांच्या मनातही आले नाही. बाजीरावाबद्दल त्यांना काही विशेष भक्ती होती, असेही नाही. त्याला दौलतराव शिंद्याने कैदही केले होते. पण त्या वेळी या सरदारांनी काय केले ? तर त्याचा धाकटा भाऊ चिमाजी याला पेशवा केले; इतकेच. म्हणजे वंशपरंपरेचा धागा राखायला पाहिजे ! लायकी असो नसो, बापाच्या जागी मुलगा आलाच पाहिजे. हे सर्व सरदार तसेच आपल्या पदावर आले होते. तेव्हा दुसरे काही तत्त्व त्यांच्या मनात कसे येणार !

नेता नाही
 या काळातला मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब फारच वाईट आहे. मागल्या काळचा हिशेब निराशाजनकच होता. पण आधीच्या शंभर वर्षात रामचंद्रपंत अमात्य, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, नानासाहेब, माधवराव, नाना फडणीस, महादजी यांच्यासारखा सर्वांची एकजूट घडविणारा, निःस्वार्थी, काही थोडी ध्येयनिष्ठा असणारा, असा एखादा तरी पुरुष निर्माण झालेला दिसतो. पण या वीस बावीस वर्षांत तसा एकही पुरुष पुढे आला नाही. नाना फडणीस हा आधीच्या वीस वर्षांत त्या वृत्तीचा पुरुष होता. पण स्वतःच्या स्वार्थाला आणि जिवाला धोका आहे असे दिसताच इतके दिवस राष्ट्रीय संसार चालविणाऱ्या या पुरुषाने, निजाम व इंग्रज यांशी हातमिळवणी करून, त्यांची मदत मागितली ! राघोबाने तरी यापेक्षा निराळे काय केले होते ? सखाराम बापूला नानाने कशासाठी तुरुंगात घातले होते ? अधःपात याचा अर्थ असा आहे.

नियतीचे कोडे
 राज्याचा संसार एकसूत्रात गोवील, लढाईपुरती का होईना, सर्व शक्ती एक कार्यवाही करील, असा १७९६ ते १८१८ या काळात एकही नेता महाराष्ट्राला मिळाला नाही, हे केवढे दुर्दैव होय ! राष्ट्राभिमानाचा आणि भौतिक विद्येचा अभाव हीच विनाशाची कारणे होत, हे खरे. पण आधीच्या काळात तसे असूनही एखादा तरी नेता, वर सांगितल्याप्रमाणे, मराठ्यांना लाभत असे, आणि तो हा संसार कसाबसा चालवीत असे. पण या काळात तसा एकही कर्ता पुरुष जन्मला नाही, हे खरोखरच दुर्दैव होय. राष्ट्राभिमान व भौतिक विद्या यांच्या अभावी मराठयांचा नाश अटळ होता. पण अशा कर्त्या पुरुषाने आणखी थोडे तरी जीवदान दिले असते. वास्तविक